चंद्रपूर :- ‘द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘बाळूभाऊ मित्र परिवार’ Balubhau Mitra Parivar यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर शहरातील न्यू इंग्लिश शाळेचे मैदान, वरोरा नाका चौक येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विशेष उपस्थितीत “वेध मराठी मनाचा, उत्सव चंद्रपूरकरांचा” या संकल्पनेखाली भव्य सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत भव्य ‘भाऊंची दहीहंडी’, ५ ते १० वर्षे वयोगटातील बालगोपाळांसाठी ‘वेशभूषा स्पर्धा’ तसेच महिलांसाठी ‘रस्सीखेच स्पर्धा’ अशा विविध आकर्षक स्पर्धा रंगणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ३:०० वाजता महिलांच्या भव्य रस्सीखेच स्पर्धेने होईल, ज्यामध्ये १८ वर्षांवरील महिलांना सहभाग घेता येईल; या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ११,०००,₹७,००० आणि ५,००० रोख पारितोषिक व आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी ५:०० वाजता ५ ते १० वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘भारतातील थोर महापुरुष’ या विषयावर आधारित वेशभूषा स्पर्धा पार पडेल, ज्यातील विजेत्यांना अनुक्रमे ५,०००, ३,००० आणि २,००० रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविले जाईल.
या संपूर्ण उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेली सर्वांसाठी खुली असलेली भव्य ‘भाऊंची दहीहंडी’ स्पर्धा सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल, ज्यामध्ये विजेत्या गोविंदा पथकास १,५१,००० रु. व आकर्षक चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. या सर्व स्पर्धांसाठी आयोजकांकडून विशिष्ट अटी व नियम लागू करण्यात आले असून, वेशभूषा स्पर्धेसाठी उद्या सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत तर रस्सीखेच स्पर्धेसाठी आधारकार्डसह नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या भव्य सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवात चंद्रपूर शहर व परिसरातील नागरिकांनी, गोविंदा पथकांनी, महिलांनी आणि बालगोपाळांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन ‘द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट’ व ‘बाळूभाऊ मित्र परिवार’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
