चंद्रपूर :- सार्वजनिक गणेशोत्सव व विसर्जन सोहळा २०२६ शांततेत, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी योगदान देणाऱ्या गणेश मंडळांसह विविध घटकांचा चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलीस मुख्यालय येथे गणेशोत्सव शांतता व जनजागृती पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. Chandrapur Police honors ‘the’ elements that made Ganeshotsav a success
युवतीला घरात कोंबून जबरी चोरी…..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी (भा.पो.से.), प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अकनुरी नरेश (भा.प्र.से.), अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी प्रास्ताविकातून गणेशोत्सवादरम्यान पोलीस प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना, नागरिकांचे सहकार्य आणि सामाजिक जनजागृती स्पर्धेची पार्श्वभूमी विशद केली.
मनपा आयुक्त अकनुरी नरेश यांनी पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि नागरिकांच्या समन्वयामुळे विसर्जन सोहळा कोणतीही दुर्घटना न घडता सुरळीत पार पडल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आभार व्यक्त करण्यासोबतच गणेशोत्सवाचे पावित्र्य जपत सामाजिक भान वाढविणे आणि तरुणाईला सकारात्मक दिशा देणे हा आहे. जिल्ह्यातील गणेश मंडळे, शांतता समिती, पोलीस मित्र आणि जागरूक नागरिकांनी दाखविलेली शिस्त व प्रशासनाला दिलेले सहकार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
उत्कृष्ट गणेश मंडळांचा गौरव
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे ‘अमली पदार्थ विरोधी जनजागृती, ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि महिला सुरक्षा’ या विषयांवरील विशेष देखावा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्या मंडळांना रोख पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रथम क्रमांक : हिवरपुरी बाल गणेश मंडळ, चंद्रपूर — ₹२१,०००
द्वितीय क्रमांक : श्री विठ्ठल मंदिर वॉर्ड गणेश मंडळ, चंद्रपूर — ₹११,०००
तृतीय क्रमांक : श्री नवयुवक बाल गणेश मंडळ, दत्तनगर, चंद्रपूर — ₹५,१००
याशिवाय चंद्रपूर शहर, रामनगर, पडोली, दुर्गापूर, घुग्घुस, वरोरा, भद्रावती आणि बल्लारपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील नियमांचे पालन करणाऱ्या विविध गणेश मंडळांना व पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र देण्यात आले.
विविध घटकांचा कृतज्ञता सन्मान
गणेशोत्सव आणि विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध घटकांचाही यावेळी विशेष कृतज्ञता प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
चंद्रपूर शहर महानगरपालिका : विसर्जन घाटांवरील स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि विसर्जनाचे नियोजन केल्याबद्दल मनपा आयुक्त अकनुरी नरेश व मनपा पथकाचा सन्मान करण्यात आला.
महावितरण : मिरवणूक मार्गावर अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा सुरळीत ठेवल्याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
डी.जे. व साऊंड सिस्टिम असोसिएशन : न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी मर्यादा व निर्धारित वेळेचे पालन करून सहकार्य केल्याबद्दल असोसिएशनचा सन्मान करण्यात आला.
शांतता समिती, पोलीस मित्र व इको-प्रो संस्था : पोलीस बंदोबस्तात प्रत्यक्ष मदत, सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सदस्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास भद्रावतीचे प्रभारी ठाणेदार, रामनगर, दुर्गापूर, पडोली, घुग्घुस, वरोरा व बल्लारपूर पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार, गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, पोलीस मित्र आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
