Friday, October 2, 2026
HomeCrimeयुवतीला घरात कोंडून चोरी; वरोऱ्यात जबरी चोरीचा थरार; पोलिसांनी २४ तासांत आरोपी...

युवतीला घरात कोंडून चोरी; वरोऱ्यात जबरी चोरीचा थरार; पोलिसांनी २४ तासांत आरोपी पकडला

चंद्रपूर :- घरात घुसून तरुणीला बेडरूममध्ये डांबून ठेवत रोख रक्कम लंपास केल्याच्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा वरोरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. या प्रकरणी प्रज्वल प्रमोद झिले (वय १९, रा. टेमुर्डा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादीची मुलगी कॉलेजमधून घरी परतली. यावेळी घराचा वॉलकंपाउंडचा गेट बंद असताना घराचा दरवाजा उघडा दिसला. तिने घरात प्रवेश केला असता बेडरूमच्या दरवाजाजवळ तोंडाला दुपट्टा बांधलेला अनोळखी तरुण दिसला.
तरुणीने आरडाओरड केल्यानंतर आरोपीने तिचा हात पकडून तिला ओढत बेडरूममध्ये ढकलले. या घटनेत तिच्या डाव्या हाताच्या कोपराला व करंगळीला दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद करून तेथून पळ काढला.

दरम्यान, फिर्यादी व त्यांची पत्नी सुमारे ३.३० वाजता शेतातून घरी परतले. घराचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर बेडरूममधून मुलीचा आवाज ऐकू आला. त्यांनी दरवाजा उघडून मुलीला बाहेर काढले. त्यानंतर बेडरूममधील आलमारी तपासली असता त्यातील ५ हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १००४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३३१(३), ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या आदेशाने तपास पथकाने तपासाला वेग दिला.

तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रज्वल झिले याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष बाकल आणि पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनिष तालेवार, पोलीस हवालदार संदीप मुळे, प्रशांत नागोसे, पोलीस अंमलदार विशाल राजुरकर, मनोज ठाकरे, अमोल नवघरे, सौरभ कुलथे, सुखराज यादव व महेश गावतुरे यांनी पार पाडली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular