District-Level Agriculture, Livestock & Poultry Exhibition, and Mini Saras Hirai Festival
चंद्रपूर :- शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी व कृषी संलग्न विभागांच्या योजना, तंत्रज्ञान व उपक्रमांची माहिती मिळावी तसेच उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीला चालना मिळावी या उद्देशाने जिल्हास्तरीय कृषी, पशु-पक्षी प्रदर्शन व मिनी सरस हिराई महोत्सव – 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. हा 5 दिवसीय महोत्सव 20 ते 24 मार्च 2026 दरम्यान चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हा महोत्सव कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), पशुसंवर्धन विभाग (जिल्हा परिषद) तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवात सेंद्रीय व बिगर सेंद्रीय शेतमालाची विक्री, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला स्वयं सहाय्यता गट व बचत गटांमार्फत तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री तसेच कृषी व पशुपालन विषयक माहितीपर स्टॉल उभारण्यात येणार आहेत. एकूण 325 स्टॉल उभारण्यात येणार असून त्यामध्ये शासकीय योजना, कृषी निविष्ठा, कृषी प्रात्यक्षिके, कृषी यांत्रिकीकरण, पशु-पक्षी प्रदर्शन, खाद्य स्टॉल तसेच चर्चासत्रे व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
महोत्सवात सूक्ष्म सिंचन अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, जलयुक्त शिवार अभियान, सेंद्रीय शेती, श्री पद्धतीची भात लागवड यांसारख्या उपक्रमांची माहिती व प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. तसेच मधुमक्षिका पालन, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन, रेशीम उद्योग आदी कृषी संलग्न क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. याशिवाय पशु-पक्षी प्रदर्शनामध्ये देवणी, डांगी, खिल्लार, लालकंधारी, गवळाऊ, कठाणी यांसारख्या गाईंच्या जाती, गीर व थारपारकर देशी गायी तसेच जर्सी संकरीत गायी, नागपुरी, जाफ्राबादी, पंढरपुरी व मुर्रा म्हशी, तोतापरी, उस्मानाबादी, बेरारी, बिटल, कच्छी, बारबेरी व आफ्रिकन बोअर या शेळ्यांच्या जाती तसेच कुक्कुट व बदकांचे विविध प्रकार प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
महोत्सवात अनुभवी व पुरस्कारप्राप्त शेतकरी, शास्त्रज्ञ व उद्योजक यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान, कृषीविषयक परिसंवाद तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन कार्यक्रमही होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ‘पैसारे पैस’ हे दोन अंकी नाटक तसेच महारोगी सेवा समिती, आनंदवन यांच्या स्वरानंदवन ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांचे तंत्रज्ञान, अद्ययावत कृषी उपकरणे तसेच विविध योजनांची माहिती मिळणार असून शेतकरी उत्पादकांकडून शेतमालाची थेट वाजवी दरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक व ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ, चंद्रपूर यांनी केले आहे.