चंद्रपूर : अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस पोक्सो कायद्यान्वये १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. दंड न भरल्यास आरोपीस एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. हा निकाल ५ सप्टेंबर २०२६ रोजी सुनावण्यात आला. Accused sentenced to 10 years of rigorous imprisonment
ही घटना ३ जून २०२२ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली होती. फिर्यादी व त्यांची पत्नी कामावरून घरी परतल्यानंतर अल्पवयीन मुलगी घरी दिसून आली नाही. मुलगी बाहेर खेळण्यासाठी गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पालकांनी तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना आरोपीच्या घराजवळून मुलीचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. त्यावेळी आरोपी हा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करताना आढळून आला.
या घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६११/२०२२ दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६(एबी), ५०६ तसेच पोक्सो कायदा २०१२ मधील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.
गुन्ह्याचा सखोल तपास करून तपासी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल तसेच अन्य परिस्थितीजन्य पुरावे संकलित केले. तपास पूर्ण करून न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सदर खटल्याची सुनावणी मा. श्री. पी. एम. गुप्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्री. एस. आर. डेगावार यांनी प्रभावी युक्तिवाद करत साक्षी-पुरावे न्यायालयासमोर मांडले.
हे पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची राजुरकर, पोलीस ठाणे रामनगर यांनी केला. न्यायालयीन पैरवीची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक शामराव पोईनकरे, पोलीस ठाणे रामनगर यांनी पार पाडली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूर यांच्या समन्वयाने पूर्ण करण्यात आली.