Wednesday, October 28, 2026
HomeEducationalNSUI च्या निवेदनाचा परिणाम ; "मन की बात" वरून विद्यार्थ्यांवर कारवाई नाही

NSUI च्या निवेदनाचा परिणाम ; “मन की बात” वरून विद्यार्थ्यांवर कारवाई नाही

चंद्रपूर :- ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या उपस्थितीवरून निर्माण झालेल्या वादानंतर शांतराम पोतदुखे विधी महाविद्यालय प्रशासनाने स्पष्टीकरण जारी केले आहे. विद्यार्थ्यांवर कोणताही दंड आकारला जाणार नाही तसेच उपस्थितीच्या मुद्द्यावरून कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. NSUI ने विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या निवेदनानंतर हा खुलासा करण्यात आला. Impact of NSUI’s statement: No action against students over “Mann Ki Baat”

२५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना पाठविण्यात आलेल्या नोटिशीतील अनिवार्य उपस्थिती आणि दंडासंदर्भातील उल्लेखामुळे वाद निर्माण झाला होता. या प्रकरणाची दखल घेत NSUI ने महाविद्यालय प्रशासनाकडे निवेदन सादर करून विद्यार्थ्यांवर कोणताही अनावश्यक दबाव आणू नये, अशी मागणी केली होती.

महाविद्यालय प्रशासनाने २७ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या स्पष्टीकरण पत्रात, सुरुवातीच्या डिजिटल संदेशामध्ये अनवधानाने अनिवार्य उपस्थिती आणि दंडासंदर्भातील उल्लेख झाल्याचे स्पष्ट केले. तसेच, २४ ऑक्टोबरच्या सायंकाळी सर्व विद्यार्थ्यांना सुधारित संदेश पाठवून हे उल्लेख वगळण्यात आल्याची माहिती दिली.

विद्यार्थ्यांना दंड नाही, शिस्तभंगाची कारवाईही नाही

कार्यक्रमातील उपस्थितीच्या संदर्भात कोणत्याही विद्यार्थ्याकडून दंड आकारण्यात आलेला नाही आणि भविष्यातही आकारला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, या कार्यक्रमातील उपस्थितीच्या कारणावरून कोणत्याही विद्यार्थ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नसल्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.

NSUI ने विद्यार्थ्यांचे अधिकार, सन्मान आणि शैक्षणिक हितांचे संरक्षण करणे ही संघटनेची प्राथमिकता असल्याचे सांगितले. शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. एखाद्या नोटिशीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम किंवा भीती निर्माण झाल्यास प्रशासनाने वेळेत पारदर्शक स्पष्टीकरण द्यावे, अशी भूमिका संघटनेने मांडली.

विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागणीला प्रतिसाद देत महाविद्यालय प्रशासनाने स्पष्टीकरण जारी करणे हे सकारात्मक पाऊल असल्याचे NSUI ने म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या योग्य व्यासपीठावर मांडून त्यांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धारही संघटनेने व्यक्त केला.

NSUI चे महाराष्ट्र प्रदेश सचिव मनीष दास यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी आशीष बोंडे, रमीज शेख, यश दत्तात्रेय, प्रशांत हलदर, माधव मंडल आणि शुभम लवणगेवार आदींची उपस्थिती होती.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular