Tuesday, October 27, 2026
HomeAcb Trap४० हजारांची लाच घेताना कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

४० हजारांची लाच घेताना कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

चंद्रपूर : बंधाऱ्याच्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ५५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारणाऱ्या कोरपणा येथील कृषी सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वर्धा पथकाने मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) रंगेहात पकडले. हरी विठ्ठलराव उदगीरे (वय ३५) असे कारवाई करण्यात आलेल्या कृषी सहाय्यकाचे नाव आहे. या कारवाईमुळे कृषी विभागातील लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. Agriculture Assistant caught in ACB trap while accepting a bribe

५५ हजारांची मागणी; तडजोडीनंतर ४० हजार स्वीकारले

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने केलेल्या बंधाऱ्याच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी आरोपी कृषी सहाय्यकाने सुरुवातीला ५५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर तडजोड होऊन ४० हजार रुपये तत्काळ स्वीकारण्याचे, तर उर्वरित रक्कम नंतर घेण्याचे ठरले.

तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे २७ ऑक्टोबर रोजी शासकीय पंचांच्या उपस्थितीत लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे ५०० रुपयांच्या ८० नोटा, अशी एकूण ४० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपी हरी उदगीरे याला एसीबीच्या पथकाने सायंकाळी ५.५५ वाजता रंगेहात पकडले. त्यानंतर आरोपीच्या अंगझडतीत विवो कंपनीचा मोबाईल फोन आणि ५९५ रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, गडचांदूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. केदार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर हे करीत आहेत.

वर्धा एसीबी पथकाची कारवाई

सदर सापळा कारवाई पोलीस निरीक्षक संदीप मुपडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार मंगेश झामरे, सचिन गाडवे तसेच पोलीस शिपाई प्रीतम इंगळे, लक्ष्मण केंद्रे आणि विष्णू काळुसे यांनी पार पाडली.

नागरिकांना एसीबीचे आवाहन

कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular