चंद्रपूर – बल्लारपूर शहरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अत्याधुनिक सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणाली उभारण्याची मागणी केली आहे. यासाठी तातडीने तांत्रिक मान्यता देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली. या मागणीची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अपर मुख्य सचिव (गृह) यांना ‘अ’ प्रमाणे तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना सुरक्षित वातावरणात निर्भयपणे वावरता यावे आणि पोलिसांना गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविता यावे, या व्यापक जनहिताच्या भूमिकेतून आ. मुनगंटीवार यांनी हा विषय शासनदरबारी मांडला आहे.
बल्लारपूर शहरातील नागरिकांची सुरक्षितता अधिक भक्कम करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, संवेदनशील ठिकाणे तसेच प्रवेश व निर्गमन मार्गांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणाली उभारण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. औद्योगिक व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बल्लारपूरमध्ये गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे, संशयास्पद हालचालींवर प्रभावी नजर ठेवणे आणि पोलिसांच्या तपासकार्यात आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे, या उद्देशाने ही मागणी आ.मुनगंटीवार यांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन शहराची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आ. मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली.
बल्लारपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणाली उभारण्याच्या दृष्टीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मागणीनुसार, चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांनी यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला आहे. या प्रणालीअंतर्गत शहरातील प्रमुख व संवेदनशील ठिकाणी उच्चक्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे, आधुनिक नियंत्रण कक्ष, रेकॉर्डिंग व स्टोरेज व्यवस्था, नेटवर्किंग आणि अखंडित वीजपुरवठ्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे प्रस्तावित आहे. या यंत्रणेमुळे संशयास्पद हालचालींवर प्रभावी नजर ठेवणे, गुन्ह्यांच्या तपासासाठी दृश्य पुरावे उपलब्ध करणे आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यास मदत होणार आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूरच्या नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने अत्याधुनिक सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणाली उभारण्याचा विषय सातत्याने शासनदरबारी मांडला आहे. त्यांच्या या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळून आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासोबतच नागरिकांच्या मनात सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
