चंद्रपूर : सिद्धपल्ली हल्लीची ‘ओमॅट’ कंपनीत घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. कंपनीत काम करणाऱ्या प्रवीण कुडे (रा. तांडाळी) यांचा काल कंपनीत दुर्दैवी मृत्यू झाला. अत्यंत वेदनादायी बाब म्हणजे, या घटनेची कोणतीही कल्पना कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्या दुःखी कुटुंबियांना दिली नाही आणि उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगत सत्य लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या बेजबाबदार प्रकाराची माहिती मिळताच, खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी तातडीने याची गंभीर दखल घेतली. त्यांच्या आदेशानुसार चंद्रपूर ग्रामीण तालुका कॉंग्रेस अध्यक्ष अनिल नरुले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः प्रशासनाशी व संबंधित कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधत कंपनीला धारेवर धरले. त्यांच्या या कणखर आणि संवेदनशील भूमिकेमुळे कंपनी व्यवस्थापनाला अखेर नमते घ्यावे लागले.
या यशस्वी पाठपुराव्यामुळे मृताच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असून, कुटुंबियांना १० लक्ष रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला. तसेच, अंत्यविधीसाठी तात्काळ आर्थिक मदत देऊन प्रवीण कुडे यांचा मृतदेह त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांकडे सन्मानाने सुपूर्द करण्यात आला.
