चंद्रपूर :- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील (सीटीपीएस) कॉपर वायर चोरी तसेच यापूर्वी झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या लोखंडी पाईप व भंगार चोरीप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पत्रकार परिषदेत केली. चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास ‘मनसे स्टाईल’ने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीटीपीएसमधील CSTPS काही कर्मचारी आणि स्थानिक भंगार चोरट्यांच्या संगनमतातून वीटभट्टीच्या आडून विद्युत केंद्रातील साहित्य चोरीचा प्रकार सुरू असल्याचा आरोप मनसेने केला. या प्रकरणात सुरक्षा अधिकारी, पडोली परिसरातील अवैध धंदे करणारे तसेच काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहभागाचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
कॉपर वायर चोरीप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी नुकतीच कारवाई करून वीज केंद्रातील अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा गार्ड, कर्मचारी तसेच भंगार चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, यापूर्वी झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या पाईप चोरीप्रकरणी कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून साधी तक्रारही दाखल करण्यात आली नसल्याचा दावा मनसेने केला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कॉपर वायर चोरीप्रकरणात काही आरोपींची नावे समोर आली असताना या प्रकरणातील मुख्य सूत्रधारावर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवालही मनसेने उपस्थित केला. चोरीच्या घटनांमागील संपूर्ण साखळीचा तपास करून संबंधित अधिकारी, कर्मचारी अथवा इतर व्यक्तींचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
कॉपर वायर आणि पाईप चोरीप्रकरणाचा पूर्ण छडा लावून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला.
आयोजित पत्रकार परिषदेला मनसेचे राजू कुकडे तसेच मनसे जनहित कक्ष विभागाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रमेश काळबांदे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर आणि वर्षा बोमले उपस्थित होते.
