चंद्रपूर :- यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील औद्योगिक व खाण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून मुकुटबन ते गडचांदूर दरम्यान ३८.२१ किमी लांबीच्या नवीन रेल्वेमार्गासाठी भारतीय रेल्वेने ४९३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या विशेष प्रयत्नांमुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या बहुप्रतीक्षित प्रकल्पाला यश मिळाले आहे. या नव्या मार्गामुळे मुकुटबन आणि गडचांदूर परिसरातील सिमेंट उद्योग, कोळसा खाणी आणि चुनखडीच्या खाणींमधून होणारी मालवाहतूक अधिक जलद, सुरक्षित व कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. Gadchandur – Mukutban Railway line gets approval
हा नवीन रेल्वेमार्ग उपलब्ध झाल्यामुळे प्रवासाचे अंतर, वेळ आणि वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. तसेच हा मार्ग वर्धा-माणिकगड रेल्वे विभागाला उत्तम पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणार असल्याने सध्याच्या मार्गावरील वाहतुकीचा अतिरिक्त ताण कमी होईल. रेल्वे मंत्रालयाच्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून दरवर्षी तब्बल ६.०८ दशलक्ष टन मालवाहतूक होण्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये कोळसा, सिमेंट, स्पंज आयर्न, लोखंड, खते आणि अन्नधान्याचा समावेश असेल.
चंद्रपूर च्या भूमिपुत्रांसाठी अप्रेंटिस्शिप च्या संधी वाढवा…….
या रेल्वेमार्गामुळे कोळसा आणि सिमेंट उद्योगांना माजरी-नांदेड रेल्वेमार्गाशी थेट जोडणी मिळणार असून कच्च्या मालाची वाहतूक कमी अंतरातून करणे शक्य होईल. यामुळे बल्लारपूर-नागपूर या अत्यंत गर्दीच्या आणि उच्च घनता असलेल्या रेल्वेमार्गावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. परिणामी, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील तुलनेने कमी रेल्वे जोडणी असलेल्या ग्रामीण व औद्योगिक भागांचा विकास वेग घेईल.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या मंजुरीबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की, ही मंजुरी गडचांदूरसह संपूर्ण परिसराच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. या रेल्वेमार्गामुळे उद्योगांना मोठा फायदा तर होईलच, शिवाय प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही दिशेने प्रवासी गाड्या सुरू होणार असल्याने स्थानिक नागरिकांच्या प्रवासाची सोय अधिक उत्तम आणि सोयीस्कर होईल.
