चंद्रपूर :- जिल्ह्यात अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर-बामणी मार्गावर पहाटे सापळा रचून ओडिशातून आणलेला तब्बल ५.७४९ किलो गांजा जप्त केला. LCB’s ‘Operation Ganja’ on the Ballarpur-Bamni road
या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, गांजा, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम व वाहतुकीसाठी वापरलेल्या बॅगेसह सुमारे ३.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ४ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, दोन व्यक्ती बल्लारपूर येथून बामणीमार्गे चामोर्शीच्या दिशेने गांजाची वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ कळविण्यात आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून राजपत्रित अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत बल्लारपूर-बामणी मार्गावरील होंडा शोरूम तथा जिओ सेंटर परिसरात सापळा रचण्यात आला.
५ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे २.३५ वाजता पोलिसांना मिळालेल्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या दोन व्यक्ती लाल-काळ्या रंगाच्या बॅगा घेऊन बामणीकडे जाताना दिसून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे मंगेश संतोष उंदीरवाडे (२३, रा. सोनापूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) आणि सागर बाबूराव मरगडे (१९, रा. निमगाव, ता. पवनी, जि. भंडारा) अशी सांगितली.
राजपत्रित अधिकारी व पंचांसमक्ष बॅगांची झडती घेतली असता त्यामध्ये ब्राऊन पॅकिंग टेपने गुंडाळलेली पार्सल्स तसेच सुटा गांजा आढळून आला. तपासणीदरम्यान एकूण ५.७४९ किलो गांजा, दोन मोबाईल फोन, ३,८०० रुपये रोख आणि बॅग असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत सदर गांजा ओडिशा राज्यातून आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात NDPS Act, 1985 मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमली पदार्थाचा स्रोत, वाहतूक मार्ग आणि या रॅकेटमागील इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. Chandrapur Police
सदर कारवाई चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गोरकर, पोहवा सतीश आवथरे, इम्रान खान, लालु यादव, संदीप, प्रफुल गारघाटे, किशोर वैरागडे, हिरालाल गुप्ता, पोअं. किशोर वाकडे, शशांक बदामवार, चा.पो.अ. मिलिंद टेकाम तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोहवा कार्तिक खणके सहभागी होते.
