चंद्रपूर :- एक काळ असा होता की, गरीब कुटुंबातील माता-भगिनींच्या स्वयंपाकघरात चुलीचा धूर भरलेला असायचा. डोळ्यांत पाणी आणणारा, आरोग्यावर परिणाम करणारा हा धूर त्यांच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. स्वयंपाकासाठी लाकूड गोळा करण्यासाठीची पायपीट, धुराने भरलेली स्वयंपाकघरे आणि स्वच्छ इंधनासाठीची प्रतीक्षा हे चित्र आता मोठ्या प्रमाणात बदलले आहे. देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेने १० कोटी ५७ लाख कुटुंबांपर्यंत गॅस कनेक्शन पोहोचवत गरीबांच्या घरातील चुलीचा धूर दूर करून त्यांच्या जीवनात स्वच्छता, सुलभता आणि आत्मविश्वासाचे नवे पर्व सुरू केले आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar यांनी केले. Inauguration of the newly constructed gas godown of the Ballarpur Colliery Employees’ Co-operative Society
बल्लारपूर कॉलरी एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या नवनिर्मित गॅस गोडाऊनचे उद्घाटन आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमात यावेळी वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा डब्ल्यूसीएल बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक राजेंद्र ठाकरे, बल्लारपूरच्या नगराध्यक्ष अलकाताई वाढई, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, प्रकाश खरतड तसेच सोसायटीचे पदाधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. भगवान श्रीकृष्णाची कृपा सर्वांच्या जीवनावर राहो, प्रत्येकाचे जीवन मंगलमय आणि समाधानी होवो, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.
गॅसच्या सुरुवातीच्या काळातील आठवणी सांगताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपुरात गॅस सुविधा सुरू झाली तेव्हा आपण आठ वर्षांचे होतो. स्वस्तिक गॅस एजन्सीमार्फत गॅस कनेक्शन घेणाऱ्या जिल्ह्यातील सुरुवातीच्या कुटुंबांमध्ये आमच्या कुटुंबाचा २१ वा क्रमांक होता, अशी आठवण त्यांनी सांगितली.आज गॅस ही केवळ सुविधा राहिलेली नसून प्रत्येक कुटुंबाची मूलभूत गरज बनली आहे. गॅसमुळे स्वयंपाकाच्या प्रक्रियेत सहजता, सरलता आणि सुलभता आली आहे. मात्र, एकेकाळी गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी दोन-दोन, तीन-तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागत होती पण आता ही परिस्थिती बदललेली आहे असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
पूर्वी श्रीमंत कुटुंबेच गॅस वापरू शकत होती; आता गरीबातील गरीब कुटुंबाच्या घरातही गॅस पोहोचला आहे,असे सांगत आ. मुनगंटीवार यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या परिणामाकडे लक्ष वेधले. २ सप्टेंबर पर्यंत देशात १० कोटी ५७ लक्ष कुटुंबांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबांना धुरापासून मुक्त स्वयंपाकघर मिळाले असून माता-भगिनींच्या जीवनात स्वच्छता, सुरक्षितता आणि सुलभता आली आहे.
गॅसच्या किमतीबाबत बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, भारत मोठ्या प्रमाणावर गॅसची आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा इंधनाच्या किमतींवर परिणाम होतो. अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये गॅसच्या किमती वाढल्या असून, पाकिस्तानमध्ये एका सिलेंडरसाठी सुमारे ३ हजार रुपये मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीतही गरीब कुटुंबांना गॅस परवडावा, यासाठी केंद्र सरकारने किमती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. गरीबांच्या इंधनाची गरज लक्षात घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या या प्रयत्नांसाठी आ. मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानले.
वनमंत्री असताना जंगलालगतच्या गावांमध्ये टप्प्याटप्प्याने मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची आठवण आ. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितली. जंगलातून लाकूड तोडण्यासाठी नागरिकांना जावे लागू नये, वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका कमी व्हावा आणि त्याचबरोबर जंगलांचे संरक्षण व्हावे, हा या निर्णयामागील उद्देश होता. स्वच्छ इंधनाचा प्रसार हा केवळ नागरिकांच्या सुविधेचा विषय नसून पर्यावरण आणि वनसंवर्धनाशीही जोडलेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.बल्लारपूर कॉलरी एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने उभारलेले हे नवे गॅस गोडाऊन नागरिकांना गॅस सुरक्षित आणि सहज उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे सांगत आ. मुनगंटीवार यांनी संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.
जागतिक परिस्थितीचा इंधनाच्या किमतींवर परिणाम होत असताना भविष्यात स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जेकडे वळणे आवश्यक आहे. इंधन सुरक्षेसोबत ऊर्जा स्वावलंबनासाठी सौरऊर्जेला प्राधान्य द्यावे, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. उथळपेठनंतर चिंतलधाबा येथे १०० टक्के सौर ग्राम उपक्रम राबविण्यात येणार असून, त्याच धर्तीवर बल्लारपूरमधील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांचा वीज खर्च कमी करण्यासाठी नगर परिषदेने सौरऊर्जा योजनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आ.मुनगंटीवार यांनी केले.
