Friday, September 4, 2026
HomeEducationalविद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘स्नेहसंपदा’ची शैक्षणिक मार्गदर्शनाची हाक

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘स्नेहसंपदा’ची शैक्षणिक मार्गदर्शनाची हाक

चंद्रपूर :- विद्यार्थ्यांना शिक्षणातील विविध संधी, उच्च शिक्षणाचे पर्याय, शिष्यवृत्ती आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, तसेच त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने स्नेहसंपदा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, चंद्रपूर यांच्या पुढाकारातून शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. भवाणजीभाई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्नेहसंपदा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, गरजू विद्यार्थ्यांना सहकार्य, मार्गदर्शन शिबिरे तसेच विविध परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढविण्याचे कार्य करीत आहे. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून या शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भवाणजीभाई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य टोंगे सर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नेचर फाउंडेशन, नागपूरचे संस्थापक निलेश नन्नावरे सर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या एन. डी. मुप्पीडवार मॅडम, पर्यवेक्षिका जवादे मॅडम आणि पर्यवेक्षक ढवस सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकात टोंगे सर यांनी स्नेहसंपदा संस्थेच्या विद्यार्थीहितैषी कार्याचा गौरव केला. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.

प्रमुख मार्गदर्शक निलेश नन्नावरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील विविध पर्यायांची सविस्तर माहिती दिली. “शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक संधी आहेत; मात्र त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी आयआयटीमध्ये केवळ इंजिनिअरिंगच नव्हे, तर बी.ए., बी.एस्सी.सारखे विविध अभ्यासक्रमही करता येतात, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. मुलींसाठी उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक संधी, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, शासनाच्या योजना आणि विविध अभ्यासक्रमांची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण तयारी करण्याचे आवाहन केले.

“मार्गदर्शक आपले विचार देऊन जातात; मात्र विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करून त्या विचारांची ज्योत आपल्या मनात पेटवली, तर त्याच प्रकाशात आपले भविष्य उज्ज्वल करता येईल,” असा प्रेरणादायी संदेश एन. डी. मुप्पीडवार यांनी अध्यक्षीय भाषणातून दिला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्नेहसंपदा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव किशोर वानखेडे यांनी विशेष सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष हितेश मडावी, कोषाध्यक्ष हरिचंद्र अलोणे, तसेच संकेत जयकर, बुरेले, स्वप्नील गावंडे, मालेकर, कवाडे, घोनमोडे सर, योगेश सोनवणे यांच्यासह सहकारी शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेले मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन बुरेले सर यांनी केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular