चंद्रपूर :- चंद्रपूर परिमंडळात वीजचोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणने धडक कारवाई सुरू केली असून, गेल्या पाच महिन्यांत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच इतर वर्गवारीतील तब्बल ६७४ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. Electricity theft
यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ३१० तर गडचिरोली जिल्ह्यातील ३६४ वीजचोऱ्यांचा समावेश आहे. MSEDCL
वीजचोरीची रक्कम दंडासह निर्धारित मुदतीत न भरणाऱ्या ७ ग्राहकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वीजचोरी करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
चंद्रपूरमध्ये ५१.५९ लाखांचे मूल्यांकन
महावितरणने एप्रिल महिन्यापासून वीजचोरीला आळा घालण्यासाठी घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज जोडण्यांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. या मोहिमेत चंद्रपूर जिल्ह्यात ३१० वीजचोऱ्या उघड झाल्या. या प्रकरणांमध्ये ५१ लाख ५९ हजार ३१४ रुपयांचे वीजचोरीचे मूल्यांकन करण्यात आले.
गडचिरोलीत ३६४ वीजचोऱ्या
गडचिरोली जिल्ह्यातही महावितरणच्या पथकांनी जोरदार कारवाई करत ३६४ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या. या प्रकरणांत ४८ लाख ७५ हजार ८९५ रुपयांचे वीजचोरीचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
वीजचोरी विरोधात कारवाई आणखी तीव्र
चंद्रपूर परिमंडळातील वीजचोरीची एकूण मूल्यांकन रक्कम १ कोटी ३५ हजार २०९ रुपये असून, संबंधित ग्राहकांकडून या रकमेचा भरणा करण्यात आला आहे. वीजचोरी हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून, वीजचोरी आढळल्यास दंडात्मक तसेच फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
त्यामुळे ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणीचा वापर करून वीजचोरीसारख्या गैरप्रकारांपासून दूर राहावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
