Tuesday, August 25, 2026
HomeAgricultureमहसूल लोक अदालतीमध्ये अधिवक्ता व पक्षकारांनी सहभागी व्हावे

महसूल लोक अदालतीमध्ये अधिवक्ता व पक्षकारांनी सहभागी व्हावे

चंद्रपूर :- राज्यात महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोडीने व सहमतीने निकाली काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’ अभियानचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली महसुली प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यास मदत होईल. या अदालतीमध्ये अधिवक्ते व पक्षकारांनी सहभागी होऊन सदर अभियान यशस्वी करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले. Mahatma Jyotirao Phule Revenue Lok Adalat कोळसा खाणीतील तीव्र ब्लास्टिंग थांबवा – खा. प्रतिभा धानोरकर

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात जिल्हा न्यायालय येथील बार असोसिएशनच्या कार्यालयात आयेाजित कार्यक्रमात डॉ. व्यवहारे बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲङ विक्रम टंडन, उपाध्यक्ष ॲङ अमन मारेकर, सचिव ॲङ अभिजित किन्हीकर आदी उपस्थित होते.

 

महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकरी, शेतजमीन या विषयावर मोठा लढा दिला, असे सांगून अपर जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय आणि हक्क पोहोचविणे, हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे मूळ सुत्र होते. त्यामुळेच राज्य शासनाने त्यांच्या नावाने ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’ अभियान सुरू केले आहे,

सदर अभियान संपूर्ण राज्यात 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित महसुली दावे मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. विविध कारणांमुळे हे दावे प्रलंबित राहिल्याने पक्षकारांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळे पक्षकारांमध्ये आपसी समझेाता करून सदर प्रकरणे निकाली काढण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. ज्या अधिवक्त्यांकडे अशी महसुली प्रकरणे आहेत, त्यांनी संबंधित पक्षकारांसोबत बोलून यात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा, जेणेकरून महसुली प्रकरणांची संख्या कमी करून पक्षकारांना दिलासा मिळेल, असे अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी सांगितले.

उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम म्हणाले, पक्षकारांचा, अधिवक्त्यांचा व महसूल यंत्रणेचा वेळ वाचावा, यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. महसुली दाव्यांमध्ये कधीकधी अतिशय शुल्लक प्रकरणे असतात. दोन्ही पक्षकारांना योग्य पध्दतीने समजावून सांगितले तर या माध्यमातून त्यांना वेळेत न्याय मिळू शकतो. आपसी संवाद/तडजोड झाली तर प्रकरणे लवकर निकाली निघतील. यात पक्षकारांचा सहभाग आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲङ विक्रम टंडन म्हणाले,  शेतक-यांना आपल्या केसेस लढण्यासाठी वर्षानुवर्षे न्यायालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येणार आहे. सर्व अधिवक्ता आणि पक्षकार यात सहभागी होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे संचालन बार असोसिएशनचे सचिव ॲङ अभिजित किन्हीकर यांनी केले. यावेळी वरिष्ठ अधिवक्ता श्री. सातपुते यांच्यासह बार असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular