Tuesday, August 25, 2026
HomeAgricultureसिंदेवाहीत काँग्रेसचा जनआक्रोश महामोर्चा

सिंदेवाहीत काँग्रेसचा जनआक्रोश महामोर्चा

चंद्रपूर :- केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या कथित जनविरोधी, शेतकरीविरोधी आणि युवकविरोधी धोरणांविरोधात काँग्रेसच्या वतीने सिंदेवाही येथे विराट जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार MLA Vijay Wadettiwar यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कामगार तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. सरकारविरोधी घोषणांनी सिंदेवाही शहर दणाणून गेले. Congress’s ‘Jan-Aakrosh’ (Mass Outrage) Rally in Sindewahi

शिवाजी चौक येथून सुरू झालेल्या मोर्चाच्या समारोपावेळी आ. विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “देशाला कर्जबाजारीपणा आणि महागाईच्या खड्ड्यात लोटण्याचे महापाप भाजप सरकारने केले,” असा घणाघात त्यांनी केला. सरकारच्या धोरणांचा फायदा सर्वसामान्य जनतेपेक्षा मोजक्या उद्योगपतींना होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून बेरोजगारीमुळे युवकांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असून महिलांच्या सुरक्षेचे प्रश्नही गंभीर असल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे समाजातील प्रत्येक घटक त्रस्त असल्याचा दावा त्यांनी केला.

लाडकी बहीण योजनेवरही वडेट्टीवारांनी सरकारला लक्ष्य केले. निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासने देण्यात आली; मात्र सत्तेत आल्यानंतर सुमारे एक कोटी महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही, कर्जमाफीची घोषणा फसवी ठरली असून शेतकऱ्यांना त्याचा अपेक्षित लाभ मिळालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील कथित भ्रष्टाचारावर टीका करताना “४० टक्के कमिशनशिवाय काम होत नाही,” असा आरोप त्यांनी केला. संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या लाभासाठी नागरिकांना कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांच्या जमिनी कंपन्यांच्या नावावर हडपण्याचा डाव असल्याचा आरोप करत, “शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत राहू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शिक्षण व्यवस्थेवरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. हजारो शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्यांची आर्थिक लूट होत असल्याचेही त्यांनी म्हटले.

देशभरातील युवकांनी सरकारविरोधात व्यक्त केलेल्या संतापाचा उल्लेख करत जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचाही त्यांनी निषेध केला. “जनविरोधी सरकारला जनता आता धडा शिकवेल,” असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.

मोर्चाच्या समारोपानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाला देण्यात आले. वाढती महागाई नियंत्रणात आणणे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना हमीभाव व न्याय मिळवून देणे, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करणे आणि सर्वसामान्यांवरील आर्थिक भार कमी करणे, या प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

या मोर्चामुळे सिंदेवाही तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने शक्तिप्रदर्शन केले.

यावेळी सिंदेवाही तालुका व शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, विविध फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत पदाधिकारी, ग्राम काँग्रेस कमिटी, सरपंच संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तालुक्यातील कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular