चंद्रपूर :- अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून युवा पिढीला दूर ठेवण्यासाठी चंद्रपूर पोलिस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त युवा भारत अभियान’ अंतर्गत जिल्हाभरात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील तब्बल २०३ शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘Say No to Drugs’ उपक्रम घेण्यात आला. आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको……..
यावेळी ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचे सेवन न करण्याची तसेच नशामुक्त समाज घडविण्यासाठी पुढाकार घेण्याची सामूहिक शपथ घेतली.
विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेविरोधात जागरूकता निर्माण करणे, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देणे आणि निरोगी व सुरक्षित पिढी घडविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पोलिसांच्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय महामार्ग बाधितांच्या प्रश्नावर NHAI अधिकाऱ्यांसोबत निर्णायक बैठक…….
मान्यवरांच्या उपस्थितीत शपथविधी
सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी नशाविरोधी शपथ घेतली. शिवाजी हायस्कूल, राजुरा येथे आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
बी.जे.एम. कारमेल अकॅडमी, चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या घातक परिणामांची माहिती देत नशेपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तर खत्री कॉलेज, चंद्रपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चोगुले यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
जनजागृतीत लोकसहभागाची जोड
या अभियानात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार, मुख्याध्यापक, शिक्षक, स्थानिक लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. त्यामुळे पोलिसांच्या या मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले.
