Wednesday, August 19, 2026
HomeAccidentआश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको

चंद्रपूर :- गडचिरोली जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना तातडीने लोखंडी पलंग, बेड, गाद्या, चादरी, मच्छरदाण्या, बसण्यासाठी बेंच, तसेच आवश्यक सुरक्षा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष, शिवसेना भारतीय कामगार संघटना चंद्रपूर, संतोष लिलाबाई दशरथ पारखी यांनी केली आहे. Do not play with the lives of students in Ashram schools

यासंदर्भात पारखी यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी राचेलवार यांना निवेदन सादर केले. प्रशासनाने आठवडाभरात ठोस कार्यवाही करावी, अन्यथा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून अनेक आश्रमशाळा जंगलालगत आहेत. पावसाळ्यात साप, विंचू आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढतो. त्यामुळे आश्रमशाळांची प्रत्यक्ष सुरक्षा तपासणी करून दारे, खिडक्या, जाळ्या, प्रकाश व्यवस्था, परिसराची स्वच्छता आणि विद्यार्थ्यांची झोपण्याची व्यवस्था तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी जमिनीवर झोपतात, त्यांची स्वतंत्र यादी तयार करून तातडीने पलंग उपलब्ध करून द्यावेत. तसेच सर्पदंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी जवळच्या रुग्णालयाशी संपर्क व्यवस्था, प्रथमोपचार साहित्य आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, अशी मागणी पारखी यांनी केली.

“आमचा लढा कोणत्याही अधिकाऱ्याविरोधात नसून गरीब आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,” असा इशारा पारखी यांनी दिला.

निवेदन सादर करतांना शिवसेना महिला आघाडी बल्लारपूर विधानसभा संघटिका क्रिष्णाताई सुरमवार, चंद्रपूर तालुका संघटक संजय शिंदे, महानगर उप-प्रमुख विश्वास खैरे, तालुका उप-प्रमुख विक्की महाजन आणि निखील सुरमवार उपस्थित होते.

आता प्रशासन या मागण्यांवर काय कार्यवाही करते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular