Pregnant woman dies due to lack of treatment in Jiwati Taluka
मुंबई / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात उपचाराअभावी गर्भवती महिलेचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून हा राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवरील गंभीर प्रश्न असल्याचे सांगत आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale यांनी विधिमंडळाच्या सभागृहात नियम २६० च्या प्रस्तावावर बोलताना सरकारचे लक्ष वेधले. Pregnant woman dies due to lack of treatment in Jiwati Taluka
आमदार अडबाले म्हणाले की, स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली, महाराष्ट्र विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करत आहे. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, मेट्रो, उड्डाणपूल आणि स्मार्ट सिटीसारख्या प्रकल्पांची चर्चा होत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील घोडणकापी येथील २५ वर्षीय संगीता गेडाम यांना प्रसूतीसाठी तब्बल १२ किलोमीटर उचलून न्यावे लागले. रस्त्याअभावी आणि रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने वाटेतच त्यांची प्रसूती झाली. त्यानंतर अतिरक्तस्राव (ब्लीडिंग) झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी असल्याचे सांगत त्यांनी दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य सुविधा, रस्ते आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांची दयनीय अवस्था अधोरेखित केली. आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री असतानाही अनेक गावांपर्यंत रस्ते आणि मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मृत संगीता गेडाम या गावातील एकमेव अंगणवाडी सेविका होत्या. त्यांच्या पश्चात तीन वर्षांचे एक अपत्य आणि नुकतेच जन्मलेले नवजात बाळ आहे. या दोन्ही मुलांच्या संगोपनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचेही आमदार अडबाले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी, दुर्गम आदिवासी भागात तातडीने रस्ते, रुग्णवाहिका आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी सरकारकडे केली.
