Will pursue the matter until justice is secured for the heirs of sanitation workers
चंद्रपूर :- लाड-पागे समितीच्या शिफारसी व शासन निर्णयानुसार सफाई कुली/सफाई रेजा (सफाई कामगार) यांच्या पात्र वारसांना चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाविरोधात वारसदारांनी दिनांक २२ जून २०२६ पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी आज मनपा समोरील उपोषण मंडपाला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या तीव्र भावना आणि मागण्या जाणून घेतल्या व हा न्याय्य प्रश्न त्वरित सोडवण्यासाठी प्रशासनाकडे खंबीर पाठपुरावा करण्याचे ठोस आश्वासन दिले.
राजर्षी शाहु महाराजांचे विचार समाजाला नवी दिशा देणारे…….
या संवेदनशील विषयात तातडीने पावले उचलत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागपूरचे मा. विभागीय आयुक्त यांना विशेष पत्र पाठवून प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेने ५ डिसेंबर २०२४ रोजी पात्र वारसांकडून अर्ज मागवून व झोननिहाय प्रत्यक्ष कामाचा अहवाल स्वीकारून संपूर्ण प्रक्रिया राबविली होती. परंतु, त्यानंतर अचानक “१२/०८/१९७५ ते २३/०२/२०२३ या कालावधीत अर्ज प्राप्त झाले नाहीत” असे हास्यास्पद व बेकायदेशीर कारण पुढे करून वारसांना नोकरी देण्यास नकार दिला. प्रशासनाची ही भूमिका अत्यंत अन्यायकारक, शासनाचे स्पष्ट आदेश आणि मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान करणारी असल्याचा संताप त्यांनी पत्रात नमूद केला आहे.
सफाई कामगारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेक वर्षे प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली असून, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणे ही प्रशासनाची सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे. चंद्रपूर महानगरपालिकेने अतिरिक्त पदांसाठी नगर विकास विभागाकडे पाठविलेल्या दिनांक २६/०५/२०२५ च्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन सर्व पात्र वारसांना तात्काळ वारस हक्काने नोकरीत सामावून घ्यावे, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे आंदोलकांच्या आरोग्याला कोणताही गंभीर धोका निर्माण होण्यापूर्वी किंवा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवण्यापूर्वी, प्रशासनाने त्यांच्या न्याय्य मागण्या तात्काळ पूर्ण करून हे आंदोलन सन्मानपूर्वक सोडवावे, असा स्पष्ट इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे.
