Tuesday, June 16, 2026
HomeAccidentमहामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ‘ऑपरेशन यू-टर्न’ची अंमलबजावणी

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ‘ऑपरेशन यू-टर्न’ची अंमलबजावणी

Implementation of ‘Operation U-Turn’ to prevent highway accidents – Joint vehicle checks launched in Chandrapur

चंद्रपूर :- महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी महामार्ग पोलीस, प्रादेशिक विभाग नागपूर यांच्या वतीने ‘ऑपरेशन यू-टर्न’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष नाकाबंदी व तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. ‘Operation U-Turn’ to prevent highway accidents

महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या विश्लेषणानुसार, मागील दोन वर्षांत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना, ब्लॅक स्पॉट सुधारणा, ड्रिंक अँड ड्राइव्हविरोधी मोहिमा आणि संयुक्त अंमलबजावणीमुळे अपघातांच्या प्रमाणात सुमारे ३२ टक्क्यांनी घट नोंदविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक यांनी अपघातांचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी विशेष निर्देश दिले आहेत.

‘ऑपरेशन यू-टर्न’ अंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम, हेल्मेटविना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई, ओव्हरस्पीडिंगवर नियंत्रण तसेच रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जाणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आणि इतर संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून ब्लॅक स्पॉट, सुरक्षा भिंती, साईनेज, क्रॅश बॅरिअर्स आणि प्रकाशयोजनांसह विविध सुधारणा कामांचा आढावा घेतला जाणार आहे.

महामार्ग सुरक्षा पोलिसांचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी, चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक नोपानी तसेच अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व पोलीस ठाणे व महामार्ग पोलीस संयुक्त नाकाबंदी करून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत आहेत.

नागरिकांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट लावावा तसेच वाहनाशी संबंधित सर्व कागदपत्रे जवळ बाळगावीत किंवा डिजी लॉकरमध्ये उपलब्ध ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

महामार्गावर अपघात झाल्यास तात्काळ टोल-फ्री हेल्पलाईन १०३३, पोलीस हेल्पलाईन ११२ किंवा जवळच्या महामार्ग मदत केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular