A message of environmental conservation on the occasion of World Environment Day
*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश*
चंद्रपूर :- धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, चंद्रपूर आणि विकासगंगा समाजसेवी संस्था, घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “सेंद्रिय शेतीद्वारे पर्यावरणपूरक शाश्वत शेती (वसुंधरा)” या प्रकल्पांतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येरूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. World Environment Day
सदर प्रकल्प पांढरकवडा, वढा, धानोरा, अंतूर्ला, येरूर, सोनेगाव, शेनगाव, मोरवा, ताडाळी आणि चारगाव या गावांमध्ये राबविण्यात येत असून सेंद्रिय शेतीचा प्रसार, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत.
धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे मुख्य महाप्रबंधक देवेश कुमार यांच्या नेतृत्वात आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हवामान बदलाचे वाढते दुष्परिणाम रोखण्यासाठी जनजागृती करणे तसेच पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांना चालना देणे हा होता. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येरूर गावात वृक्षारोपण करण्यात आले आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिष नायर (मुख्य व्यवस्थापक, धारीवाल), प्रतिक वानखेडे (उपव्यवस्थापक, धारीवाल), प्रियंका मडावी (सरपंच, येरूर) आणि विनोद बिट्टे (पोलीस पाटील) उपस्थित होते. यावेळी कृषी सखी, बालसखी, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.
उपस्थित मान्यवरांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि वृक्षलागवडीची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित व स्वच्छ पर्यावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व विकासगंगा समाजसेवी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले.