State-of-the-art digital computer classroom at Savitribai Phule School of the Municipal Corporation
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शिक्षण क्षेत्रातील दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, पी. एम. श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, बाबूपेठ (नेताजी चौक) येथे पी. एम. श्री योजनेअंतर्गत अत्याधुनिक व सुसज्ज डिजिटल संगणक क्लासरूम उभारण्यात आली आहे. या उपक्रमामुळे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात सामील होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या डिजिटल संगणक क्लासरूममध्ये आधुनिक संगणक प्रणाली, डिजिटल बोर्ड, इंटरनेट सुविधा तसेच तंत्रज्ञानाधारित अध्यापन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), संगणक साक्षरता, डिजिटल कौशल्ये आणि नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येणार आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, चंद्रपूर शहरातील अनेक नामांकित कॉन्व्हेंट शाळांमध्येही अद्याप अशा स्वरूपाची अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम उपलब्ध नाही, मात्र ती सुविधा आता मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली आहे. त्यामुळे शासकीय शाळाही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकतात, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.
या क्लासरूमच्या प्रभावी वापरासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे, प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना नियमितपणे संगणक व डिजिटल शिक्षणाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आधुनिक अध्यापन पद्धतींमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासोबतच त्यांच्यात तांत्रिक विचारशक्ती व नवकल्पनांची रुची निर्माण होणार आहे.
दरम्यान, या अत्याधुनिक डिजिटल संगणक क्लासरूमचे उद्घाटन लवकरच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार असून, यावेळी लोकप्रतिनिधी, शैक्षणिक अधिकारी, शिक्षक व पालक उपस्थित राहणार असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे.
या उपक्रमामुळे मनपा शाळेतील विद्यार्थी स्पर्धात्मक युगात सक्षमपणे उभे राहतील, तसेच उच्च शिक्षण व तांत्रिक क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करू शकतील, असा विश्वास शालेय प्रशासन व शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
