‘Women’s Commission at your doorstep’ initiative in Chandrapur distric on November 4
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत चंद्रपुर जिल्हयात मंगळवार 4 नोव्हेंबर 2025 रोजी जनसुनावणी होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर येथे सकाळी 11 वाजता होणा-या जनसुनावणीस महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे. ‘Women’s Commission at your doorstep’ initiative in Chandrapur district
महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर 4 नोव्हेंबर, 2025 रोजी चंद्रपुर जिल्हयात येणार आहेत. यावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासन, पोलिस, कामगार, परिवहन, आरोग्य, शिक्षण आदी विभागांची आढावा बैठक घेण्यात येईल. Rupali Chakankar, Chairperson of Maharashtra State Women’s Commission
या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोप-यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर जात आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे.