Meritorious students felicitated by Seva Kalash Foundation
चंद्रपूर :- सेवा कलश फाउंडेशन राजुरा च्या वतीने स्वयंवर मंगल कार्यालय, राजुरा येथे इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वी च्या परीक्षेत यश संपादित करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, प्रमुख वक्ते महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेंद्र डी. देव, सेवा कलश फाउंडेशन राजुराचे अध्यक्ष अभिजीत धोटे उपस्थित होते.
यावेळी श्री. शिवाजी महाविद्यालय राजुरा, इन्फंट जिजस काँन्व्हेंट राजुरा, अँड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुरा, स्टेला मॅरीस काँन्व्हेंट बामणवाडा इत्यादी शाळा, महाविद्यालयांचा आणि इयत्ता १० वी आणि १२ वी तील ३२ गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
चंद्रपूर जिल्हातून प्रथम आलेली स्नेहल रामगीरवार तसेच सम्यक हुमणे, सक्षम रंगारी, दिपांजली झा, महीवीष अली, सुरज रागीट, कार्तिक कोहळे, सुशांत आगलावे, गौरी चांदूरकर, स्विटी आत्राम यासह ३२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माजी आमदार सुभाष धोटे यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात आपल्या आई वडीलांच्या परिश्रमाचे भान ठेवून आवडीनुसार दर्जेदार शिक्षण घेवून यशस्वी होण्याचे व उत्तम नागरिक होण्याचे आवाहन केले.
प्रमुख वक्ते प्राचार्य शैलेंद्र देव यांनी यश, अपयश या जीवनाच्या दोन्ही बाजू संयमाने हाताळून सातत्याने जीवनाचे ध्येय पुर्ण करण्यासाठी परिश्रम घ्या, प्रामाणिकपणे परिश्रम घेऊन यशस्वी व्हा, आई, वडील आणि स्वतःच्या आकांक्षा पूर्ण करा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राध्यापक, शिक्षक आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप नागोसे, विद्यानंद मोहुर्ले, अजहर सिद्धिकी यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
