Wednesday, September 9, 2026
HomeCrimeराजुरा येथील पापा जाधव मर्डर प्रकरणातील 5 आरोपींवर मोक्का

राजुरा येथील पापा जाधव मर्डर प्रकरणातील 5 आरोपींवर मोक्का

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात भरदिवसा गोळीबार करून खून केल्याच्या गंभीर प्रकरणात राजुरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे.

२४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजेदरम्यान सोमणाथपूर वॉर्ड, राजुरा येथील रहिवासी विनोद ऊर्फ पापा जनार्धन जाधव हे कोर्टासमोरील किरणकुमार साईला यांच्या नारळपाण्याच्या दुकानाजवळ मित्रांसोबत बसले होते. यावेळी इंदिरानगर, राजुरा येथील आरोपी करण दुर्गीराज मेकलवार व करण दिपक बाबीस्कर यांनी तोंडाला दुपट्टा बांधून दुचाकीने तेथे प्रवेश केला.

यातील आरोपी करण दिपक बाबीस्कर याने स्वतःजवळील अग्निशस्त्रातून विनोद ऊर्फ पापा जाधव यांच्यावर गोळीबार करून त्यांची निर्घृण हत्या केली.

या घटनेप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ६९५/२०२६, कलम १०३(१), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच कलम ३, २५, २७ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या आरोपींसह गुन्ह्याचा कट रचणारे, आरोपींना अपप्रेरणा देणारे तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारे आरोपी निष्पन्न झाले.

या प्रकरणात परवेज सरवर शेख, कार्तिक उमेश खानमकर आणि सौरभ ऊर्फ भुर्जी उमेश खानमकर यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून ३ अग्निशस्त्रे, ३ रिकाम्या मॅग्झिन आणि ६ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात राजुरा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी या आरोपींविरुद्ध MCOCA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) १९९९ चे कलम लागू करण्यास रीतसर परवानगी दिली आहे.

सदर उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा. पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे व पोलीस हवालदार कैलास आलाम यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

 

Previous article
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular