Tuesday, September 8, 2026
HomePoliceचंद्रपुरात DJ व लेझर लाईट वर बंदी - कठोर कारवाईचा इशारा

चंद्रपुरात DJ व लेझर लाईट वर बंदी – कठोर कारवाईचा इशारा

सण-उत्सवात लेझर लाईट, DJ वर निर्बंध

चंद्रपूर जिल्ह्यात ५ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष मनाई आदेश; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

चंद्रपूर :- आगामी पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव आणि गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर पोलिस प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३६ व कलम ३८ (१) अन्वये विशेष मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश ५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेपासून २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. Ban on DJs and laser lights in Chandrapur

या आदेशानुसार मिरवणुका तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मानवी डोळ्यांवर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या लेझर लाईट, अत्यंत तीव्र फ्लॅश लाईट आणि धोकादायक प्रकाशयंत्रणांच्या वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या प्रकाशयंत्रणांची पोलीस अधिकारी किंवा सक्षम प्राधिकारी तपासणी करू शकतील. धोकादायक प्रकाशयंत्रणा आढळल्यास ती तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.

DJ, वुफर, सबवुफरलाही मनाई

सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक, लाउडस्पीकर किंवा अॅम्प्लीफायर वापरण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वलेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर DJ, प्लाझ्मा सिस्टीम, मॉडिफाइड साउंड इक्विपमेंट, वुफर, सबवुफर यांसारख्या अत्यंत तीव्र आणि आरोग्यास हानीकारक ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर पूर्णतः बंदी राहणार आहे.

रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व DJ वापरण्यास सक्त मनाई राहणार आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी विशेष सूट दिलेले दिवस व वेळ याला अपवाद राहतील.

सायलन्स झोनमध्ये ४० डेसिबलची मर्यादा

रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये आदी घोषित शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी दिवसा ७५ व रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रासाठी दिवसा ६५ व रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रासाठी दिवसा ५५ व रात्री ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रासाठी दिवसा ५० व रात्री ४० डेसिबल अशी ध्वनी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

उपकरणे जप्तीसह अटकेची कारवाई

निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ७० अन्वये ध्वनी व प्रकाशयंत्रणा जप्त केली जाऊ शकते. तसेच आयोजक, ऑपरेटर किंवा वाहनचालकाविरुद्ध कलम ७२(२) अन्वये वारंटशिवाय अटक करण्याची कारवाई होऊ शकते. संबंधितांविरुद्ध कलम १३४ व १३६ अन्वये न्यायालयात खटलाही दाखल केला जाऊ शकतो.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन

सण-उत्सव आनंदात आणि शांततेत पार पडावेत, नागरिकांना ध्वनी व प्रकाश प्रदूषणाचा त्रास होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिक, उत्सव मंडळे आणि आयोजकांनी नियमांचे काटेकोर पालन करून शांततापूर्ण वातावरणात सण-उत्सव साजरे करावेत आणि पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलिस प्रशासनाने केले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular