चंद्रपूर :- भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मिती आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरच्या ACB Chandrapur वतीने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या सप्ताहासाठी ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ (Probity for Prosperity) ही संकल्पना निश्चित करण्यात आली असून, या माध्यमातून नागरिकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जागरूकता निर्माण केली जाणार आहे. ‘Vigilance Awareness Week’
केंद्रीय दक्षता आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार राज्यभर हा सप्ताह राबविण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात जागरूक करणे, शासकीय कामकाजात पारदर्शकता वाढविणे आणि प्रामाणिक प्रशासनाचे महत्त्व अधोरेखित करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. Chandrapur Anti-Corruption Bureau geared up to raise public awareness against corruption
या सप्ताहादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, बसस्थानके, रेल्वेस्थानके, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासोबतच फेसबुक, व्हॉट्सॲप, एसएमएस तसेच अन्य सोशल मीडिया माध्यमांतूनही भ्रष्टाचारविरोधी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना या सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भ्रष्टाचारमुक्त समाज आणि पारदर्शक प्रशासनासाठी प्रत्येक नागरिकाने सत्यनिष्ठेची भूमिका स्वीकारणे आवश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
लाच मागितल्यास तक्रार करा
शासकीय कामकाजादरम्यान कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची अथवा अन्य कोणत्याही स्वरूपातील अवैध लाभाची मागणी करीत असल्यास नागरिकांनी दबावाला बळी न पडता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या तक्रारींसाठी विभागाने संपर्क क्रमांकही उपलब्ध करून दिले आहेत. चंद्रपूर विभागाचा दूरध्वनी क्रमांक ०७१७२-२५०२५१ आणि टोल फ्री क्रमांक १०६४ आहे. तसेच व्हॉट्सॲप क्रमांक ८३७९९५१०६४ वरही संपर्क साधता येईल.
लाचखोरीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टेवार यांनी केले आहे.
