Amrut 2.0 scheme has caused roads to deteriorate, work should be stopped until repairs are made
चंद्रपूर :- अमृत 2.0 योजनेअंतर्गत Amrut 2.0 शहरात पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण पाईपलाईन टाकण्यासाठी विविध भागांत मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्यात आले आहेत. परंतु हे काम नियोजनशून्य पद्धतीने सुरू असल्याने संपूर्ण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी, नागरिकांचे जीव धोक्यात आले असून दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अमृत 2.0 योजनेमुळे रस्त्यांची दुरवस्था दुरुस्ती होईपर्यंत काम थांबवावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांच्या सुचने नंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
आज भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यांची भेट घेत त्यांना सदर मागणीचे निवेदन दिले आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, भाजपचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, मनोज पाल, माजी नगर सेवक देवानंद वाढई, प्रदीप किरमे, राजेंद्र खांडेकर, दिनकर सोमलकर, राकेश बोमनवार, शेखर शेट्टी, रंजन ठाकूर, अॅड. हरीश मंचलवार, गणेश रासपायले, विजय चव्हाण, मुकेश गाडगे, मंगेश अहिरकर, चंदा ईटनकर, दुर्गा वैरागडे, विमल कातकर, छाया सातपुते, अनीज दीक्षित, शीतल रंगदळ, छाया चवरे, रेशमा पांडे, मंजू टोरे, अंजू मोडपल्लीवार, विनोद पेंडलीवार आदींची उपस्थिती होती.
शहरातील रस्ते सध्या अत्यंत धोकादायक झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसाळा सुरु झाला असताना काम पूर्ण न झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. कंत्राटदारांकडून कामे अत्यंत संथगतीने व निष्काळजीपणे सुरू आहेत.
पावसाचा जोर वाढल्यास खोदलेले रस्ते अधिकच खराब होतील, जलसंचयन होईल आणि अपघातांचा धोका वाढेल. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल. ही बाब लक्षात घेता, जेवढी रस्ते खोदली आहेत त्या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती होईपर्यंत पुढील काम थांबवावे, अशी स्पष्ट मागणी निवेदनाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या कामांसाठी आवश्यक निधी आधीच मंजूर झाला आहे. त्यामुळे त्याच निधीतून रस्त्यांची डागडुजी आणि पुनर्बांधणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



