Part of a dilapidated building near Jatpura Gate collapsed
चंद्रपूर :- शहरातील जटपुरा गेट परिसरात आज सकाळी घडलेल्या अपघाताने मोठी खळबळ उडाली. जुन्या आणि जर्जर अवस्थेत असलेल्या एका इमारतीचा भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत इमारतीच्या खाली दूध विक्री करणारी महिला गंभीर स्वरूपात जखमी झाली.
अपघात घडला त्यावेळी सकाळी जटपूरा परिसरात नेहमीप्रमाणे गजबज होती. त्यामुळे अचानक झालेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीची अवस्था अनेक दिवसांपासून अतिशय जीर्ण होती. परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिकेकडे इमारत पाडण्याची व योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप याकडे दुर्लक्ष झाल्याने आजची दुर्घटना घडली. कोसळलेल्या भागाखाली दूध विक्री करणारे काही व्यापारी थोडक्यात बचावले. त्यांना किरकोळ दुखापती झाल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या अपघातामुळे पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांचा जीव धोक्यात घालून अशा इमारती शहरात उभ्या आहेत, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
स्थानिक रहिवाशांनी महानगरपालिकेने तातडीने अशा जर्जर इमारतींचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.