Friday, October 9, 2026
HomeAgricultureशेतकऱ्यांसाठी महावितरणची २४×७ हेल्पलाइन सुरू

शेतकऱ्यांसाठी महावितरणची २४×७ हेल्पलाइन सुरू

चंद्रपूर :- राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने चंद्रपूर मंडळात शेतकऱ्यांसाठी २४ तास सुरू राहणारी हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. शेतातील विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बिघाड तसेच अन्य तातडीच्या वीजविषयक तक्रारींची नोंद घेऊन त्यांचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. MSEDCL launches 24×7 helpline for farmers

तक्रारीसाठी ७८७५७६१९९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात यंदा अपुऱ्या पावसामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतीसाठी होणारा वीजपुरवठा सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्यात महावितरणच्या माध्यमातून सुमारे ४७ लाखांहून अधिक कृषी ग्राहकांना विविध क्षमतेच्या वितरण रोहित्रांद्वारे वीजपुरवठा केला जातो.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वीज यंत्रणा सक्षम ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतातील रोहित्र बिघाड आणि इतर तातडीच्या वीज समस्यांकडे तत्काळ लक्ष देण्यासाठी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालय, चंद्रपूर मंडळ येथे जिल्हास्तरावर ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

या हेल्पलाइनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रारींची त्वरित नोंद घेऊन संबंधित महावितरण कर्मचाऱ्यांशी समन्वय साधला जाणार आहे. त्यामुळे वीजपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मदत होणार असून, शेतकऱ्यांना वेळेत दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांनी वीजविषयक तक्रारींसाठी ७८७५७६१९९ या हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular