Erect a full-size statue of Mahatma Phule at the Bus Stand Square
चंद्रपूर :- माळी व इतर समाजाच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर शहरातील मुख्य बसस्थानक समोरील चौकात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. Erect a full-size statue of Mahatma Jyotiba Phule
सन 1992 मध्ये तत्कालीन नगर परिषद चंद्रपूरच्या नियोजन व विकास समितीच्या सभेत ठराव क्र. 12 व 13 अन्वये बसस्थानक चौकास “महात्मा ज्योतिबा फुले चौक” असे नामकरण करून त्या ठिकाणी फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच जटपूरा गेट ते पोलीस मुख्यालय या मार्गास “महात्मा ज्योतिबा फुले मार्ग” असे नाव देण्यासही मंजुरी देण्यात आली होती.

यानंतर माळी समाजाच्या पाठपुराव्यामुळे चौकाचे नामकरण करून फलक उभारण्यात आला; मात्र पुतळा उभारण्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे 25 मार्च 2026 रोजी शिष्टमंडळाने महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव व आयुक्त अकनुरी नरेश यांची भेट घेऊन हा विषय पुन्हा मांडला.
यावेळी शिष्टमंडळाने चौकाचे सौंदर्यीकरण करून तेथे महात्मा फुले यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम येत्या 11 एप्रिल 2026 रोजी, महात्मा फुले जयंतीदिनी सुरू करण्याची मागणी केली.
दरम्यान, 11 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2027 या कालावधीत महात्मा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे होणार असून केंद्र व राज्य शासनाकडून “महात्मा फुले द्विशताब्दी जयंती महोत्सव” विविध कार्यक्रमांनी साजरा करण्याचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण, सामाजिक समानता व महिला सक्षमीकरण या विषयांवर वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
शिष्टमंडळाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी शोषित, पीडित व वंचित घटकांसाठी केलेले कार्य चिरंतन राहावे, यासाठी त्यांच्या स्मृती जपणारे असे स्मारक उभारणे आवश्यक आहे.
दरम्यान, महापौर, उपमहापौर व आयुक्त यांनी या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत, द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून 11 एप्रिल 2027 पर्यंत चौकाचे सौंदर्यीकरण व पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
निवेदन सादर करताना प्रदीप पाटील, अनिल बनकर, डॉ. संजय घाटे, सौ. शीतल गुरनुले, सौ. वैशाली महाडोळे, सौ. प्रतीक्षा येरगुडे, पप्पू देशमुख, भालचंद्र दानव, विनोद लभाने, रवी गुरनुले, अजय महाडोळे, सचिन निंबाळकर, कुणाल चहारे, सुरेश कावळे, राजू साखरकर, विनोद राऊत, राहुल बनकर, योगेश निकोडे, विश्वास बनकर, राजेंद्र नागरकर, शिरीश वासेकर, रवी बनकर, अक्षय येरगुडे, मनोज वासेकर, अनिता बोढे आदींची उपस्थिती होती.