Electricity contractors in Chandrapur threaten indefinite work stoppage
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) Msedcl अंतर्गत विविध विद्युत कामे करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे 50 वीज कंत्राटदारांनी सरकार आणि महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रलंबित मागण्या तीन दिवसांत पूर्ण न झाल्यास जिल्हाभर बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. Electricity contractors in Chandrapur threaten indefinite work stoppage
चंद्रपूर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही भूमिका स्पष्ट केली. संघटनेच्या म्हणण्यानुसार, गेल्या 2025-26 आर्थिक वर्षापासून विविध विद्युत कामांची बिले अद्यापही अदा करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या 1000 हून अधिक कामगारांच्या रोजगारावरही गदा आली आहे. बाल गुन्हेगारी कायदे अधिक कडक करा……
संघटनेने नमूद केले आहे की, निधीअभावी नवीन कामांना मंजुरी मिळत नसल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत. तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांनाही विलंब होत असल्याने वीज वितरण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास अनेक कंत्राटदार व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर जातील आणि हजारो कामगार बेरोजगार होतील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
प्रमुख मागण्या :
2025-26 पासूनची प्रलंबित देखभाल, ब्रेकडाऊन, NSC व DPDC कामांची सर्व थकीत बिले तात्काळ अदा करावीत.
2026-27 आर्थिक वर्षासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा.
प्रलंबित देखभाल व पथदिवा (पर्चेस) कामांसाठी विशेष निधी मंजूर करून वर्क ऑर्डर द्याव्यात.
नवीन विद्युत विकासकामे, देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी तातडीने वर्क ऑर्डर जारी कराव्यात.
कंत्राटदारांना बँक गॅरंटी व इतर आर्थिक अटींमध्ये शिथिलता द्यावी.
संघटनेने स्पष्ट केले आहे की, वरील मागण्यांवर तीन दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वीज कंत्राटदार बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करतील. या आंदोलनादरम्यान वीज ग्राहकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशाराही प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आला आहे.
आयोजित पत्रपरिषदेत संघटनेचे अध्यक्ष दिलीप वावरे, उपाध्यक्ष शीलवान डोके, सचिव अशोक पानेरकर, कोषाध्यक्ष नितीन चुंचूवार, सचिन कुंभलकर, विक्की सिंग, अनिल मिश्रा आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.