Wednesday, October 21, 2026
HomeCulturalश्री माता महाकाली महोत्सवाची भव्य पालखी सोहळ्याने सांगता

श्री माता महाकाली महोत्सवाची भव्य पालखी सोहळ्याने सांगता

चंद्रपूर :- जय माता महाकाली, जय महाकाली! अशा जयघोषाने दुमदुमलेले शहर, मातेच्या दर्शनासाठी आतुर झालेले भाविक, भक्तिरसात न्हाऊन निघालेले रस्ते आणि टाळ-मृदंग, ढोल-ताशांच्या निनादात पुढे सरकणारी मातेची भव्य पालखी, अशा मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात सोमवारी श्री माता महाकाली महोत्सवाची सांगता नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्याने झाली. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाचा समारोप होत असताना भाविकांच्या मनात मातेच्या पालखी दर्शनाचे समाधान आणि भक्तीचा आनंद ओसंडून वाहत होता. Grand Palkhi (palanquin) procession marks the conclusion of the Shri Mata Mahakali Mahotsav

  श्री माता महाकाली मंदिरातून सायंकाळी सांयकाळी 6 वाजता नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. मातेच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. पालखी मार्गावर ठिकठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गिरनार चौक, गांधी चौक आणि जयंत टॉकीज चौक मार्गे जटपुरा गेटची प्रदक्षिणा घालत पालखी कस्तुरबा मार्गाने पुन्हा श्री माता महाकाली मंदिरात पोहोचली. मातेची पालखी समोर येताच भाविकांनी जयघोष करत भक्तिभावाने दर्शन घेतले. या वेळी श्रद्धा, आनंद आणि उत्साह यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

  मातेची उत्सवमूर्ती आणि पालखी, आकर्षक रथ, गंगा आरती, पोतराज नृत्यसमूह, झांज-डमरू पथक आणि शिवतांडव-अघोरी नृत्याने सोहळ्याची भव्यता वाढवली. पवनसुत प्रभू श्री बाहुबली हनुमान यांचे बोलके दृश्य, वारकर्यांचा टाळ-मृदंगाचा गजर आणि विविध देवी-देवतांची साकारलेली रूपे भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. प्रत्येक सादरीकरणातून धार्मिक परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचे दर्शन घडत होते.

  आदिवासी नृत्यांचे रंगतदार सादरीकरण, अश्वावर आरूढ नवदुर्गेचे बोलके दृश्य, तुतारीचा निनाद आणि अष्टनगरीने पालखी सोहळ्याला विशेष रंगत आणली. मुलांनी सादर केलेली लाठी, काठी, दानपट्टा, तलवार आणि भाला यांसारख्या पारंपरिक शस्त्रांची प्रात्यक्षिकेही आकर्षण ठरली. विविध सामाजिक संघटनांची झाकी पथके, व्यायामशाळांचे संच, बँड पथके, कलशधारी महिला, लेझीम, ढोल-ताशा आणि ध्वज पथकांनी संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून टाकले.

  श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित देखावे, चंद्रपूर जिल्ह्यातील देवी-देवतांची मंदिरे आणि पारंपरिक सण-उत्सवांचे चित्रण, तंट्या भील यांच्यावर आधारित सादरीकरणे यांतून इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडले. बंगाली समाजातील महिलांचा शंखनाद आणि पुरुषांचे डंकावादन यांनी वातावरणात वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली. स्वच्छतेचा संदेश देणार्या सामाजिक संस्थांच्या सहभागामुळे या सोहळ्याला सामाजिक जाणिवेची जोडही मिळाली.

  आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांच्या पुढाकारातून आयोजित श्री माता महाकाली महोत्सवाने पाच दिवस चंद्रपूर शहराला भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीच्या रंगात रंगवले. विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक सादरीकरणे आणि सामाजिक उपक्रमांनी महोत्सवाची रंगत वाढवली. नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्याने या उत्सवाची भक्तिमय सांगता झाली. मातेच्या चरणी नतमस्तक होत भाविकांनी सुख, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. मातेच्या जयघोषाने दुमदुमलेले चंद्रपूर आणि भक्तांच्या मनात साठलेला अविस्मरणीय अनुभव, अशा मंगलमय वातावरणात श्री माता महाकाली महोत्सवाची सांगता झाली. यावेळी महोत्सवात आणि नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्यात सहभाग घेणा-या मंडळ, समाज, संघटना यांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देत सन्मान करण्यात आला. विविध समाज संघटणांच्या वतीने यावेळी पिण्याच्या   पाण्याची, शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.

 

 महोत्सवात वाढणारा लोकसहभाग ऊर्जा वाढविणार – आ. किशोर जोरगेवार

 आज अत्यंत भक्तिमय वातावरणात श्री माता महाकाली महोत्सवाची नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्याने सांगता होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण चंद्रपूर नगरी मातेच्या भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. मातेच्या दर्शनासाठी आलेले भाविक, विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले नागरिक आणि महोत्सवाच्या प्रत्येक उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्वांचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आभार मानले.

  यावेळी ते म्हणाले कि,  चंद्रपूरच्या माता महाकालीची महती देशभर पोहोचावी, या उद्देशाने आपण दरवर्षी महोत्सवाचे आयोजन करतो. दरवर्षी भाविकांची वाढणारी संख्या आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हा महोत्सवाची ताकद वाढवणारा आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. महोत्सव समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदत करण्यात येणार आहे. हा महोत्सव श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव आहे. आई महाकालीच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी आणि शेतकरी बांधवांच्या भरभराटीसाठी प्रार्थना करतो असे ते यावेळी म्हणाले. महोत्सवात दरवर्षी वाढणारा लोकसहभाग ऊर्जा वाढविणारा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

पाच दिवस चाललेल्या श्री माता महाकाली महोत्सवात विविध राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी महोत्सवस्थळी भेट देत मातेचे दर्शन घेतले आणि विधिवत पूजा-अर्चना करून आशीर्वाद घेतले. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांनीही महोत्सवस्थळी उपस्थिती लावत मातेच्या आरतीत सहभाग घेतला. मान्यवरांच्या उपस्थितीने महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या काळात भाविकांची मोठी गर्दी, धार्मिक कार्यक्रमांमधील उत्स्फूर्त सहभाग आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular