चंद्रपूर :- राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धांमध्ये सलग तीन वेळा सहभागी होत आपल्या खेळाचा ठसा उमटविणाऱ्या चंद्रपूरच्या युगल राकेश खोटे याने बॉक्सिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एप्रिल २०२६ मध्ये नागपूर येथे झालेल्या बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाअंतर्गत १७ वर्षांखालील राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत युगलने ६३ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले. त्याच्या या यशामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे. Chandrapur’s Yugal Khote delivers an impressive performance in boxing
युगलचा राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतील प्रवास जिद्द, मेहनत आणि सातत्याचे प्रतीक ठरला आहे. २०२४ मध्ये नोएडा येथे झालेल्या १४ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सहभाग नोंदविला. त्यानंतर १७ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत त्याने कांस्यपदकाची कमाई केली. सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी त्याला मिळाली असून, मणिपूर येथे होणाऱ्या आंतरशालेय १७ वर्षांखालील राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतही तो आपल्या कौशल्याची छाप उमटविण्यास सज्ज आहे.
युगल हा चंद्रपूर जिल्ह्यातील बॉक्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असून, त्याच्या यशामुळे जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. राष्ट्रीय स्तरावर पदक मिळविण्याची कामगिरी करत त्याने इतर होतकरू खेळाडूंसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
युगलला अकोला येथील क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत बॉक्सिंगचे प्रशिक्षण मिळत असून, तो अकोला येथील एन. डब्ल्यू. डब्ल्यू. स्वावलंबी विद्यालयात शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही यश संपादन करण्यासाठी तो सातत्याने मेहनत घेत आहे.
युगलच्या या यशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही तो उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
