Wednesday, October 7, 2026
HomeAgricultureमुलच्या कृषी महाविद्यालयासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पाठपुरावा ठरला निर्णायक

मुलच्या कृषी महाविद्यालयासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पाठपुरावा ठरला निर्णायक

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आता ठोस प्रशासकीय प्रतिसाद मिळाला असून, महाविद्यालयातील रिक्त पदांची याच महिन्यात पदभरती करण्याचे निर्देश कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. महाविद्यालयातील मनुष्यबळाची कमतरता, प्रलंबित विकासकामे आणि शैक्षणिक-संशोधनाशी निगडित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मंत्रालयात कृषिमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पदभरतीसह महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. Mul Agricultural College

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 25 वर्ष…, विकसित भारत सेवा संकल्प….

या बैठकीस कृषी विभागाचे सचिव श्री. परिमल सिंह, कृषी मूल्य आयोगाचे सदस्य श्री. बंडू गौरकर तसेच कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मूलच्या कृषी महाविद्यालयातील आवश्यक पदे दीर्घकाळ रिक्त असल्यामुळे शैक्षणिक अध्यापन, प्रशासकीय कामकाज आणि संशोधनाच्या प्रक्रियेवर निर्माण होणाऱ्या अडचणींचा मुद्दा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत ठामपणे मांडला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि महाविद्यालयाची संशोधनात्मक क्षमता अधिक बळकट व्हावी, यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयाची पदभरती याच महिन्यात करण्याची स्पष्ट मागणी आ.मुनगंटीवार यांनी केली. त्याची दखल घेत कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे 10 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करा…..

याचवेळी दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याचा प्रश्न, महाविद्यालयाशी संबंधित वनजमिनीचा प्रलंबित प्रश्न आणि कृषी विद्यापीठाचा आकृतिबंध लागू करण्याचा मुद्दाही आ. मुनगंटीवार यांनी मांडला. या प्रश्नांवरही सकारात्मक मार्ग काढण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे पदभरतीपुरता विषय मर्यादित न राहता महाविद्यालयाच्या संस्थात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मुद्दे बैठकीत ऐरणीवर आले. त्या सर्व मुद्द्यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधितांना निर्देश दिले.

एकार्जुना येथील भाजीपाला संशोधन केंद्रासाठी प्रलंबित असलेला निधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दाही आ. मुनगंटीवार यांनी प्राधान्याने उपस्थित केला. भाजीपाला उत्पादनातील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे संशोधन केंद्र अधिक सक्षम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

कृषी प्रदर्शनांमध्ये सेंद्रिय शेती आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर आधारित प्रभावी SOP (Standard Operating Procedure) तयार करण्याची मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळणे ही कृषी विकासाची तितकीच महत्त्वाची बाजू असल्याचे स्पष्ट करत, “जे विकतो ते पिकवले पाहिजे” या संकल्पनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ उत्पादनाच्या टप्प्यावर नव्हे, तर उत्पादनापासून बाजारपेठेपर्यंत सक्षम करण्याची भूमिका आ.मुनगंटीवार यांनी बैठकीत मांडली. कृषी शिक्षण, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांची सांगड घालून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रभावी व्यवस्था उभी करण्यावर त्यांनी भर दिला.

मूलचे कृषी महाविद्यालय हे केवळ विद्यार्थ्यांना पदवी देणारी संस्था न राहता दर्जेदार कृषी शिक्षण, अत्याधुनिक संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपयोगी ठरणाऱ्या ज्ञानाचे प्रभावी केंद्र बनावे, हा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचा केंद्रबिंदू आहे. महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांसोबतच त्याला आवश्यक मनुष्यबळ, संशोधनाची साधने आणि संस्थात्मक क्षमता मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मूलच्या कृषी महाविद्यालयाला अपेक्षित उंची मिळेपर्यंत त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular