Friday, September 11, 2026
HomeCrimeचंद्रपूर जिल्हा पोलीसांची विशेष प्रतिबंधक मोहीम

चंद्रपूर जिल्हा पोलीसांची विशेष प्रतिबंधक मोहीम

चंद्रपूर :- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने विशेष प्रतिबंधक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत जिल्ह्यातील विविध पोलीस उपविभागांमध्ये विशेष ‘प्रिव्हेन्टिव्ह ॲक्शन कॅम्प’ आयोजित करून संशयित व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर धडक प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. Special Preventive Campaign by Chandrapur District Police

या मोहिमेअंतर्गत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ व १२९ अन्वये आतापर्यंत तब्बल ५२८ इसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. संभाव्य गुन्हेगारी घटनांना आळा घालणे आणि समाजकंटकांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

वरोरा, चंद्रपूर, राजुरा, चिमूरमध्ये कारवाई
विशेष प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत आतापर्यंत पाच टप्प्यांत कारवाई करण्यात आली. १६ जुलै रोजी वरोरा उपविभागात १०८, तर २७ ऑगस्ट रोजी पुन्हा वरोरा येथे ११२ इसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी चंद्रपूर उपविभागात १३५, ७ सप्टेंबर रोजी राजुरा उपविभागात ७४, तर ९ सप्टेंबर रोजी चिमूर उपविभागात ९९ इसमांवर कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण ५२८ इसमांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या कक्षेत आणण्यात आले आहे.

ब्रह्मपुरी, मूलमध्येही धडक कारवाई
मोहिमेचा पुढील टप्पा आता ब्रह्मपुरी आणि मूल उपविभागात राबविण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत या दोन्ही ठिकाणी विशेष प्रिव्हेन्टिव्ह ॲक्शन कॅम्प आयोजित करण्यात येणार असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तसेच समाजात उपद्रव निर्माण करण्याची शक्यता असलेल्या इसमांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कायद्यानुसार प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे.

गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांचा प्रतिबंधात्मक पवित्रा
गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याबरोबरच गुन्हा घडण्यापूर्वीच संभाव्य गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर चंद्रपूर पोलिसांनी भर दिला आहे. या मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होणार असून, जिल्ह्यातील शांतता व सुरक्षितता कायम राखण्यास हातभार लागणार आहे.

जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे. समाजकंटक, उपद्रवी घटक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारची कठोर व सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचे चंद्रपूर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्पष्ट केले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular