Wednesday, August 26, 2026
HomeDistrict Collectorदोन तालुक्यांच्या कात्रीत नवेगाव ; ३० वर्षांपासून विकासाची वाट पाहतंय गाव

दोन तालुक्यांच्या कात्रीत नवेगाव ; ३० वर्षांपासून विकासाची वाट पाहतंय गाव

उमेश राजुरकर

चंद्रपूर :- गेल्या तब्बल ३० वर्षांपासून नवेगाव गाव विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. नवेगाव गाव कोरपना तालुक्यात येत असले, तरी गावाची ग्रामपंचायत वरोडा असून तिचा प्रशासकीय संबंध राजुरा तालुक्याशी आहे. या प्रशासकीय विसंगतीचा फटका गावाच्या विकासकामांना बसत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

“एक गाव, दोन तालुके आणि विकास मात्र कुठेच नाही!” अशी परिस्थिती नवेगावची झाली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

शासनाच्या विविध योजना, निधी आणि विकासकामांसाठी नागरिकांना वारंवार प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असून, एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

रस्त्याची दुरवस्था; नागरिक त्रस्त
नवेगावकडे जाणाऱ्या रस्त्याची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली असून, खड्डे आणि खराब रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत असून, वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
नाल्यांमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
गावातील नाल्यांची अवस्थाही अत्यंत खराब झाली आहे. सांडपाणी व्यवस्थित वाहून जात नसल्याने ठिकठिकाणी घाण व दुर्गंधी निर्माण होत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावातील नाल्यांची नियमित साफसफाई व कायमस्वरूपी निचरा व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

स्मशानभूमीचे काम रखडले
नवेगाव येथील स्मशानभूमीचा प्रश्नही अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. स्मशानभूमीचे काम सुरू करण्यात आले होते; मात्र ते पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येते.
स्मशानभूमीचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रशासकीय गोंधळाची शिक्षा ग्रामस्थांनी का भोगावी?
नवेगाव ग्रामस्थांचा मुख्य सवाल असा आहे की, गाव कोरपना तालुक्यात आणि ग्रामपंचायत राजुरा तालुक्यात असल्यामुळे विकासकामांसाठी जबाबदार प्रशासन नेमके कोणते ?
शासनाच्या योजना आणि निधी मिळविण्यासाठी होणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर करून नवेगावला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे.
“आता आश्वासन नको, ठोस निर्णय हवा!”
नवेगाव गाव राजुरा तालुक्यात समाविष्ट करावे किंवा नवेगाव ग्रामपंचायत कोरपना तालुक्यात समाविष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

रस्ता दुरुस्त करा, शिक्षणाची समस्या नाल्यांची समस्या सोडवा, स्मशानभूमीचे काम पूर्ण करा आणि गावाला आवश्यक विकासनिधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी शासन व संबंधित प्रशासनाकडे केली आहे.

दोन तालुक्याच्या वादात नवेगाव गावाचा विकास थांबला आहे तरी आम्हाला कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करावे जेणेकरून विकासाला गती येईल व शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल

बबन पेंदोर
नागरिक नवेगाव

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular