Triveni Gavhale Represents India at Russia’s Cultural Conference
चंद्रपूर :- राजुरा तालुक्यातील रामपूर येथील मूळ रहिवासी तथा सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या मराठी भाषा व साहित्याच्या अभ्यासक, सामाजिक कार्यकर्त्या आणि प्राध्यापिका त्रिवेणी रंजना जनार्धन गव्हाळे यांनी रशियातील इरकुत्स्क येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आदान-प्रदान परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. Triveni Gavhale Represents India at Russia’s Cultural Conference
रशियन फेडरेशनच्या फेडरल एजन्सी फॉर सीआयएस अफेअर्स, कॉम्पॅट्रियट्स लिव्हिंग अब्रॉड अँड इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन कोऑपरेशन यांच्या वतीने आयोजित ‘न्यू जनरेशन’ कार्यक्रमासाठी भारतातून त्रिवेणी गव्हाळे यांची निवड करण्यात आली होती. जून २०२६ मध्ये झालेल्या या परिषदेत जगभरातील निवडक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या परिषदेत सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे प्रतिनिधित्व करताना त्रिवेणी गव्हाळे यांनी भारतीय संस्कृती, मराठी साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या विविध पैलूंवर आपले विचार मांडले.
शिक्षण, साहित्य, सामाजिक जनजागृती, सांस्कृतिक संवाद, महिला प्रश्न, ग्रामीण समाज आणि सामाजिक परिवर्तन या विषयांवर त्या सातत्याने कार्यरत आहेत. मराठी साहित्यातील उच्च शिक्षणासोबतच महिला अभ्यास आणि मानसशास्त्र या क्षेत्रातील त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे समाज आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास करण्याची संधी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळाली आहे. राजुरा तालुक्यातील रामपूर गावच्या कन्येने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केल्याने चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
“रशियातील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा क्षण आहे. विविध देशांतील संस्कृतींमधील संवाद, साहित्य आणि मानवी नातेसंबंधांच्या माध्यमातून परस्पर समज वाढविण्याचा माझा प्रयत्न राहील. सखोल संशोधनाच्या माध्यमातून साहित्य आणि संस्कृतीचा दस्तावेज तयार करण्याचा माझा मानस आहे,”
– प्रा. त्रिवेणी गव्हाळे