आयुक्तांच्या आदेशावर विरोधकांचा आक्षेप : पक्षपाती कारवाईचा आरोप
चंद्रपूर :
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा प्रचाराचा जोरही वाढत आहे. ६६ जागांसाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार रणशिंग फुंकले असून शहरभरात होर्डिंग्ज, बॅनर आणि प्रचार साहित्याने वातावरण तापले आहे. मात्र, या प्रचारात आयुक्तांकडून होत असलेल्या कथित पक्षपाती कारवाईमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
शिवसेना (उबाठा) गटाचे प्रभाग क्रमांक ६ — इंडस्ट्रियल इस्टेट येथील उमेदवार हिमायुन अली यांनी आयुक्तांवर थेट आरोप करत, केवळ विरोधी पक्षाच्या उमेदवारांचेच बॅनर काढण्याचे आदेश दिले जात असल्याचा दावा केला आहे. त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
हिमायुन अली म्हणाले की, कायद्यानुसार सर्व आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. विद्यूत खांबांवर सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे बॅनर लावलेले असताना, ६ जानेवारीपासून आयुक्तांच्या आदेशाने केवळ विरोधी पक्षाचेच बॅनर हटविण्याची मोहीम सुरू आहे. यामुळे प्रचाराला मोठा अडथळा निर्माण झाला असून उमेदवारांचा उत्साह खच्ची झाला आहे.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये विरोधी पक्षाचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना (उबाठा) गटाकडून हिमायुन अली व शिल्पा कांबळे, तर वंचित बहुजन आघाडीकडून सुनिता खाडे व राजेशम फुल्लोरी हे उमेदवार मतदारांचा कौल मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रचारासाठी लावलेले बॅनर अचानक काढण्यात आल्याने विरोधी पक्षात तीव्र नाराजी पसरली आहे.
“निवडणूक अगदी तोंडावर असताना असा निर्णय घेणे लोकशाही मूल्यांना धरून नाही. आयुक्तांनी सत्ताधारी पक्षाच्या दबावाला बळी न पडता सर्व पक्षांना समान न्याय द्यावा,” अशी भावना हिमायुन अली यांनी व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेला सुनिता खाडे व राजेशम फुल्लोरी यांचीही उपस्थिती होती. आयुक्तांच्या या कथित पक्षपाती भूमिकेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या काळात या मुद्द्यावर राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
मनपा निवडणुकी दरम्यान आयुक्तांवर पक्षपाती कारवाईचा आरोप
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
