Tuesday, August 25, 2026
HomeAgricultureलॉयड्स विरोधात आंदोलन तात्पुरते स्थगित

लॉयड्स विरोधात आंदोलन तात्पुरते स्थगित

चंद्रपूर :- घुग्घूस येथील मे. लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लि.च्या लोह खनिज उद्योगातून घातक वायू, रासायनिक घनकचरा व रासायनिक द्रव्ये उद्योगालगतच्या नाल्यात सोडली जात असल्याचा आरोप करीत लॉयड्स उद्योगाची पर्यावरण परवानगी रद्द करावी, अशी मागणी संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे. या कथित प्रदूषणामुळे वर्धा नदीच्या पाण्यावर तसेच मानवी जीवन, पशुधन, वन्यजीव व जलचरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला.

या प्रश्नावर शेतकरी व नागरिकांच्या वतीने राजेश बेले यांनी २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या आदेशानुसार तहसीलदार विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती.

समितीतील कृषी अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट रोजी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली २५ ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात आली. बैठकीस प्रदूषण अधिकारी तानाजी यादव, पोलीस निरीक्षक प्रभावती ऐकुरे, पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, कृषी अधिकारी तसेच शेतकरी मोहनदास राजुरकर, वामन राजुरकर, बंडू राजुरकर, सुधाकर ठाकरे, नितेश ठावरी आणि राजेश बेले उपस्थित होते.

प्रदूषणाची चौकशी करण्याचे आश्वासन
बैठकीत प्रशासनाने लॉयड्स लोह खनिज उद्योगातील कथित प्रदूषणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तसेच CSIR-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (NEERI) यांच्यामार्फत चौकशी करून अहवाल प्राप्त करण्याची कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, उद्योगाला रासायनिक घनकचरा व रासायनिक द्रव्ये नाल्यात सोडणे तातडीने बंद करण्याबाबत बंधनकारक आदेश देण्यात आल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांमार्फत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर नियोजित जल आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

दरम्यान, शेतकरी व परिसरातील नागरिकांना या प्रकरणात योग्य न्याय न मिळाल्यास भविष्यात अधिक तीव्र स्वरूपाचे जल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजेश बेले यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या चौकशी अहवालाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular