चंद्रपूर :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम S.I.R. (एसआयआर) अंतर्गत आज 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला. Draft voter list for Chandrapur released
यावेळी मतदान केंद्रांचे अंतिम सुसूत्रीकरण, मतदार आकडेवारी, विविध अर्जासाठी लागणारी अधिकृत 12 कागदपत्रे, कायदेशीर कलमे, नोटीस कालावधी व राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (बीएलए) भूमिका याबाबतचा आढावा घेण्यात आला.
विविध नमुने व भारत निवडणूक आयोग मान्य पुरावे : मागील एसआयआर मधील मतदाराच्या किंवा त्याच्या आई-वडील/आजी-आजोबा यांच्या तपशिलाशी जुळवणी न झाल्यास अथवा नवीन नोंदणीसाठी 12 कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. यात 1)जन्माचा दाखला 2)पासपोर्ट 3) इ. 10 वी चे (मॅट्रिक) किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र, 4) रहिवासी प्रमाणपत्र 5) जात प्रमाणपत्र 6) सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील कर्मचारी / निवृत्तीवेतन ओळखपत्र, 7) राज्य / स्थानिक प्राधिकरणाची कुटुंब नोंदवही, 8) शासनाने दिलेले जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र, 9) वन हक्क प्रमाणपत्र, 10) राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, 11) शासन स्थानिक प्राधिकरण / बँक / टपाल कार्यालय / जीवन विमा महामंडळ / सार्वजनिक उपक्रम यांनी 1 जुलै 1987 पूर्वी दिलेले ओळखपत्र / प्रमाणपत्र आणि 12) आधार कार्ड (ओळखपत्र पुरावा म्हणून स्वीकारले जाईल).
नमुना क्र. 6 (नवीन नाव नोंदणी ) : सध्याच्या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले नागरिक तसेच 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकास 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदार नमुना क्र. 6 भरून नोंदणी करू शकतात.
नमुना क्र. 7 (नाव वगळणे / आक्षेप ) : मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा दुबार नोंदी असलेल्या मतदारांचे नाव वगळण्यासाठी संबंधित मतदारसंघातील कोणताही मतदार नमुना क्र. 7 भरून हरकत घेऊ शकतो.
*नमुना क्र. 8 (दुरुस्ती / स्थलांतर ) : मतदार यादीतील स्वतःच्या नोंदींमध्ये दुरुस्ती (नाव, वय, नातेसंबंध, फोटो), पत्ता बदल किंवा दिव्यांग नोंदीसाठी नमुना क्र. 8 भरता येईल.
एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदणीस बंदी : लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 चे कलम 17 व 18 नुसार एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नोंदविता येत नाही. सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणीच गणना अर्ज भरणे बंधनकारक आहे. खोटी घोषणा केल्यास किंवा मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा वगळणीसाठी अर्ज करताना चुकीची घोषणा / विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 नुसार संबंधितास 1 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही होऊ शकतात.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सहकार्याचे आवाहन : सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपापल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत (बीएलए) प्रारूप मतदार यादी आणि 2 लक्ष 70 हजार 153 अनकाऊंटेबल मतदारांच्या यादीची सखोल पडताळणी करावी. कोणत्याही मदतीसाठी 1950 या टोल फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा ECINET APP /ceoelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. Verification of 2.70 lakh ‘uncountable’ voters to be conducted
सदर बैठकीला जिल्हाधिकारी वसूमना पंत यांच्यासह अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संजीव देशमुख, तहसीलदार विजय पवार तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
