Wednesday, May 20, 2026
HomeEmploymentमहाजेनकोत तरुणांची झेप - तरुणांच्या स्वप्नांना आ. सुधीर मुनगंटीवारांचे बळ

महाजेनकोत तरुणांची झेप – तरुणांच्या स्वप्नांना आ. सुधीर मुनगंटीवारांचे बळ

Youth Soar at Mahagenco

चंद्रपूर :- तरुणांच्या डोळ्यांतील स्वप्नांना यशाची नवी झळाळी मिळाल्याचा भावनिक क्षण डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर येथील उपस्थितांनी अनुभवला. महाजेनको तंत्रज्ञ-३ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या भव्य सत्कार सोहळ्यात केवळ यशाचा गौरव झाला नाही, तर संघर्ष, आशा आणि विश्वासाचाही सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वप्नपूर्तीच्या या प्रवासात खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेले राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आणि आधार ठरली. विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होताना त्यांनी केवळ शुभेच्छाच दिल्या नाहीत, तर त्यांच्या भविष्यातील प्रवासातही आपण त्यांच्यासोबत असल्याची भावनिक ग्वाही दिली. MLA Sudhir Mungantiwar Empowers the Dreams of the Youth

महाजेनको तंत्रज्ञ-३ पदासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांतर्फे आयोजित सत्कार कार्यक्रम, चंद्रपूर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय येथे पार पडला. यावेळी, इंजि. मंगेश गौरकार, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष छबुताई वैरागडे,ग्रामपंचायत पडोलीचे सरपंच विक्की लाडसे, सामाजिक कार्यकर्ता सचिन यामावार आदी उपस्थित होते.

आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाजेनको तंत्रज्ञ-३ परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. चंद्रपूरची आराध्य देवता माता महाकाली यांच्या चरणी प्रार्थना करतो की, या सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना ऊर्जा, शक्ती आणि यश मिळो, अशी प्रार्थना आ. मुनगंटीवार यांनी माता महाकाली चरणी केली.

महाजेनको तंत्रज्ञ-३ भरती प्रक्रिया रखडली असताना विद्यार्थ्यांनी अनेक अपेक्षांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यावेळी त्यांच्या संघर्षाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मी सातत्याने केला. विद्यार्थ्यांच्या आशा केवळ कागदावर अडकून राहू नयेत, यासाठी आपण नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. आज त्यांनी परीक्षा उत्तीर्ण करून यशाचे शिखर गाठले असले तरी पुढील टप्पा नियुक्तीचा आहे आणि विद्यार्थ्यांच्या हातात नियुक्तीपत्र पडावे यासाठीही पूर्ण शक्तीने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रेमाने या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले, आत्मीयतेने स्वागत केले आणि व्यक्त केलेल्या भावना मनाला स्पर्श करून गेल्या. आज येथे उपस्थित उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे तेज आठवत आहे. महाराष्ट्राला प्रत्येक पावलावर प्रेरणा, शक्ती आणि ऊर्जा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा म्हणून जगभर ओळखला जातो. ज्या भूमीत सर्वाधिक वाघ आहेत, त्या भूमीतील तरुणांमध्येही तितकीच जिद्द, धैर्य आणि सामर्थ्य आहे. त्यामुळे तंत्रज्ञ-३ परीक्षा उत्तीर्ण होणे हा यशाचा शेवट नसून नव्या जबाबदारीची सुरुवात आहे. आता केवळ कुटुंबाचीच नव्हे, तर राज्य आणि समाजसेवेची जबाबदारीही तुमच्यावर आहे. त्यामुळे आयुष्यात मिळालेली प्रत्येक जबाबदारी निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पण भावनेने पूर्ण करा, असे आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी केले.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करत त्यांच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा दिल्या. हा क्षण केवळ सत्काराचा नव्हता, तर अनेक संघर्ष, स्वप्ने आणि मेहनतीला मिळालेल्या यशाच्या मान्यतेचा भावनिक सोहळा ठरला.यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या यशाच्या प्रवासात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या पाठबळाची आठवण करत कृतज्ञ भावना व्यक्त केल्या आणि संकटाच्या काळात पाठीशी उभे राहिल्याबद्दल आ.मुनगंटीवार यांचे आभार मानले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular