नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने संवेदनशील कलाकार आणि शेतकऱ्यांचा कैवारी हरपला – आ. किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar
ज्यांच्या अभिनयाने अनेक दशके महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, असे ज्येष्ठ अभिनेते, संवेदनशील कलाकार आणि समाजसेवक नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी असल्याची शोकसंवेदना आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे.
आपल्या दमदार आणि वास्तववादी अभिनयाने नाना पाटेकर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार तसेच पद्मश्रीसारख्या सन्मानांनी त्यांच्या कलाप्रवासाचा गौरव झाला. मात्र पुरस्कार आणि प्रसिद्धीपेक्षाही त्यांची खरी ओळख होती ती त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची, निर्भीड स्वभावाची आणि माणुसकीशी असलेल्या बांधिलकीची.
नाना पाटेकर हे केवळ रुपेरी पडद्यावरचे अभिनेते नव्हते, तर पडद्याबाहेरही माणुसकीची भूमिका जगणारे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांचे दुःख त्यांनी केवळ ऐकले नाही, तर ते स्वतःचे दुःख मानून त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. मकरंद अनासपुरे यांच्या सोबत ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबे आणि ग्रामीण भागाच्या प्रश्नांसाठी काम उभे केले. जलसंधारण, पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित करणे, शेतकर्यांना आधार देणे आणि गरजू कुटुंबांना मदतीचा हात देत त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.
अनेक प्रसंगी नाना पाटेकर यांच्याशी भेटण्याचा योग आला. त्यावेळी त्यांच्या साधेपणाचा, स्पष्टवक्तेपणाचा आणि सामाजिक प्रश्नांविषयी असलेल्या संवेदनशीलतेचा जवळून अनुभव आला. आमच्या वतीने सुरू असलेल्या ‘अम्मा का टिफिन’ या उपक्रमाची माहितीही त्यांना दिली होती. समाजातील गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविणार्या अशा उपक्रमांविषयी त्यांना असलेली आस्था आणि आपुलकी आजही मनात कायम आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या त्या भेटी आता आठवणी बनून मनाला अधिकच चटका लावून जात आहेत.
मनात जे आहे ते स्पष्टपणे बोलण्याची त्यांची शैलीही तितकीच वैशिष्ट्यपूर्ण होती. अन्याय, शेतकर्यांचे प्रश्न, सामाजिक विषमता किंवा माणसांच्या वेदना असोतकृनाना पाटेकर यांनी प्रसिद्धीची पर्वा न करता आपले मत निर्भीडपणे मांडले. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे ते केवळ अभिनेते नव्हे, तर समाजाच्या वेदना व्यक्त करणारा एक संवेदनशील आवाज म्हणूनही ओळखले गेले.
कलाकार म्हणून मिळालेली प्रसिद्धी स्वतःपुरती न ठेवता ती समाजातील दुःखी, वंचित आणि गरजू माणसांच्या मदतीसाठी वापरणारे नाना पाटेकर म्हणूनच कायम स्मरणात राहतील. ‘नाम’च्या माध्यमातून त्यांनी उभा केलेला सेवाभाव हा त्यांच्या अभिनयाइतकाच प्रभावी आणि प्रेरणादायी वारसा आहे.
नाना पाटेकर यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एका समर्थ अभिनेत्याची उणीव निर्माण झाली आहेच मात्र त्याहून मोठी पोकळी समाजसेवेच्या क्षेत्रात निर्माण झाली आहे. शेतकर्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात आशेची पालवी फुलवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
नाना, तुमची कला पडद्यावर जिवंत राहील तुमचा स्पष्ट आवाज काळाच्या ओघातही घुमत राहील आणि माणसासाठी जगण्याचा तुम्ही दिलेला संदेश समाजाच्या मनात कायम जिवंत राहील. तुमच्यासोबतच्या भेटींच्या आठवणी कायम मनात जपल्या जातील.
माता महाकाली त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांसह ‘नाम फाउंडेशन’च्या सर्व सहकार्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
दमदार अभिनय अन् सामाजिक बांधिलकीचा महामेरू हरपला – आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
ज्येष्ठ अभिनेते, नाट्य-चित्रपटसृष्टीतील अद्वितीय व्यक्तिमत्त्व आणि ‘नाम फाउंडेशन’चे संस्थापक-प्रमुख नाना पाटेकर यांच्या अकाली निधनाची बातमी मनाला अत्यंत तीव्र वेदना देणारी आहे. कलाक्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनावर आपल्या कर्तृत्वाचा सखोल ठसा उमटवणारा एक संघर्षशील अन् स्वाभिमानी स्तंभ आज ढासळला आहे.
आपल्या खास संवादफेकीने, भारदस्त आवाजाने आणि वास्तववादी अभिनयाने त्यांनी रंगभूमी व चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांचा अभिनय केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा नव्हता, तर प्रेक्षकांच्या मनाचा आणि भावभावनांचा ठाव घेणारा होता. पडद्यावर दाखवलेला कणखरपणा आणि तडफदारपणा त्यांनी आपल्या खऱ्या आयुष्यातही तितक्याच निडरपणे जपला.
केवळ अभिनय क्षेत्रापुरते मर्यादित न राहता, समाजातील तळागाळातील माणसांशी आणि विशेषतः संकटग्रस्त बळीराजाशी त्यांनी जुळवून घेतलेली नाळ अत्यंत दुर्मिळ होती. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देणे, जलसंधारणाची कामे उभी करणे आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, यातून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ घालून दिला.
नाना पाटेकर हे एक व्यक्तिमत्त्व नसून एक विचार होते. त्यांच्या जाण्याने भारतीय कलासृष्टीचे आणि महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या परिवारास व कोट्यवधी चाहत्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली!
आमदार सुधाकर अडबाले
सिनेअभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानेचित्रपट व कला क्षेत्राची अपरिमित हानी – हंसराज अहीर Hansraj Ahir
चंद्रपूर :- आपल्या चतुरस्त्र, प्रतिभासंपन्न अभिनयातून नाटक, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारे व आपल्या पात्राला अजरामर करणारे महान कलावंत नाना पाटेकर यांचे 75व्या वर्षी दुःखद निधन झाल्याने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाच्या कला व सांस्कृतिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली, एक मराठी कलावंत ज्याने आपल्या अप्रतिम अभिनयातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपली अविस्मरणीय छाप सोडली व देशभरात लौकीक प्राप्त केला अशा महान कलावंत, प्रसिद्ध अभिनेत्याचे आकस्मिकपणे निघून जाणे वेदनेदायी असल्याचे पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
अमोघ वक्तृत्व व वैचारिक बांधिलकीचे धनी असलेल्या नानांचे केवळ चित्रपट सृष्टीमध्येच योगदान होते असे नाही तर सामाजिक, विश्वस्त क्षेत्रामध्येही त्यांनी अत्यंत पोटतिडकीने कर्तव्य भावनेतून आयुष्यभर भरीव कार्य केले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांनी व्यथित झालेल्या नाना पाटेकरांनी ‘नाम फाऊंडेशन’ च्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना मदतीचा हात देत फार मोठे परोपकारी कार्य केले होते. अशा महान कलावंताच्या निधनाने मन व्यथित झाले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती प्रदान करो व हे दुःख पचविण्याची कुटूंबिय व त्यांच्या असंख्य चाहत्यांना शक्ती लाभो हीच प्रार्थना.
हंसराज अहिर