चंद्रपूर :- ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिमय झाले. ढोल-ताशांचा गजर,देखावे, गणेशभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग आणि बाप्पाच्या निरोपावेळी दाटून आलेले भावनिक क्षण यामुळे गणेश विसर्जन सोहळ्याला भक्ती आणि उत्साहाचे अनोखे वैभव लाभले. हजारो गणेशभक्तांनी शांततेत आणि शिस्तीत आपल्या लाडक्या बाप्पाला श्रद्धापूर्वक निरोप दिला. चंद्रपूरचा गणेश विसर्जन सोहळा हा भक्ती, शिस्त आणि सामाजिक एकतेचा सुंदर आविष्कार ठरला, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar यांनी केले. विसर्जन सोहळ्याच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांनी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन, पोलिस दल, गणेश मंडळे, कार्यकर्ते आणि चंद्रपूरकर नागरिकांचे विशेष कौतुक केले.
चंद्रपूर शहरातील भव्य गणेश विसर्जन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या विसर्जन मिरवणुकीत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार सहभागी झाले. विविध गणेश मंडळांना भेट देत त्यांनी गणेशभक्तांशी संवाद साधला, त्यांना शुभेच्छा दिल्या. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समाधान आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. शहराच्या विविध भागांतून उमटणाऱ्या ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने वातावरणात भक्तीचा उत्साह संचारला.
गणेश भक्तांनी अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. विविध गणेश मंडळांनी साकारलेले आकर्षक देखावे,मल्लखांबाचे थरारक प्रात्यक्षिक, आकर्षक ढोल-ताशांचा निनाद आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विसर्जन सोहळ्याला विशेष रंगत आली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात निरोपाची हुरहूर आणि पुढील वर्षी पुन्हा बाप्पाच्या स्वागताची आस एकवटली होती. डोळ्यांत विरहाचे अश्रू, मनात भक्तीचा भाव आणि ओठांवर बाप्पाचा जयघोष, अशा भावस्पर्शी वातावरणात हजारो भाविकांनी गणरायाला निरोप दिला.
यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकर ,डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाजारे, राम लाखिया, सय्यद चांद पाशा, प्रकाश धारणे, पुरुषोत्तम सहारे, रवी लोणकर, जयश्री जुमडे,छबुताई वैरागडे,नम्रता ठेमस्कर,सविता सरकार,सुनीता जयस्वाल,शिला चव्हाण,चंद्रकला सोयाम, कल्पना बगुलकर,रेणू घोडेस्वार,सुप्रिया सरकार,वंदना संतोषवार,माया उईके, शितल आत्राम,संगीता बावणे,मोनिशा महातव, मनीषा ठुणेकर, काशिनाथ सिंह, रवीश सिंह, श्रीनिवास जंगम, अजय सरकार, अनिल डोंगरे, प्रलय सरकार, महेंद्र जुमळे, आकाश मस्के, विकी लाडसे, सूर्यकांत कुचनवार, सोहम बुटले, प्रमोद शिरसागर, सत्यम गाणार, श्रीनिवास कंदकुरी, होमेश्वर नंदनवार, बाळू कोलनकर,प्रवीण बर्डे, अनिल अडूर, सचिन यामावार, मोनीश आस्वानी तसेच भारतीय जनता पार्टी चंद्रपूर शहर व ग्रामीणचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले.
आ. मुनगंटीवार यांनी विविध गणेश मंडळांना भेट देऊन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. गणेशोत्सवाच्या काळात मंडळांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे तसेच विसर्जन सोहळ्याच्या उत्कृष्ट नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा राखत उत्सव साजरा केल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे अभिनंदन केले.
या पार्श्वभूमीवर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिका, पोलिस प्रशासन, गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व गणेशभक्तांचे अभिनंदन करताना सांगितले की,गणरायाला निरोप देतानाही चंद्रपूरकरांनी भक्तीबरोबरच शिस्त, संयम आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा जपली. प्रशासन, गणेश मंडळे, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या समन्वयातून पार पडलेला हा विसर्जन सोहळा चंद्रपूरच्या सांस्कृतिक समृद्धी, सामाजिक एकता आणि भक्तीभावाचे दर्शन घडवणारा ठरला आहे.