चंद्रपूर :- राजुरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी कौटुंबिक वादाच्या प्रकरणात चौकशीसाठी आलेल्या नागरिकांना व काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना अश्लील शिवीगाळ, मारहाण व अपमानास्पद गैरवर्तन केले आहे. तसेच एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मिसिंग तक्रारीबाबत चौकशीसाठी आलेल्या तिच्या विधवा आईचा अपमान करून अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केले. या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून त्याच्यावर कडक विभागीय कारवाई करण्याची मागणी केली आहे. Serious allegations against Rajura police officer
१९ सप्टेंबर २०२६ रोजी राजुरा नगर परिषदेच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला मोकडे यांच्या मुलाच्या कौटुंबिक वादाच्या प्रकरणात विचारपूस करण्यासाठी गेलेले राजुरा शहर अध्यक्ष हरजीत सिंह संधू यांच्याशी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी अरेरावी व अपमानास्पद भाषा वापरली. त्यानंतर कुणाल मोकडे याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांबद्दल अत्यंत अश्लील व गलिच्छ भाषा वापरून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा अनादर केला.
याव्यतिरिक्त, राजुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी हर्षाली सत्यपाल मोहूर्ले हिच्या मिसिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या तिच्या गरीब विधवा आईला कोणतीही मदत न करता, अत्यंत मानहानीकारक शब्द बोलून जबाबदारी झटकण्यात आली. एका असहाय्य विधवा महिलेला आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्याऐवजी असा बेजबाबदार व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असल्याचा घणाघात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पोलीस प्रशासनाकडून सामान्य जनता व लोकप्रतिनिधींना हीच वागणूक मिळत असेल, तर हे खपवून घेतले जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधित्व कायदा व शिस्तभंगाच्या नियमांनुसार तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. जर या प्रकरणात प्रशासनाने दिरंगाई केली, तर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना शिष्टमंडळात जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा कुंदा जेनेकर, राजुरा तालुका अध्यक्ष रंजन लांडे, राजुरा बाजार समितीचे सभापती संतोष इंदुरवार, राजुरा शहर अध्यक्ष हरजीत सिंह संधू, कार्याध्यक्ष संघपाल देठे, नगरसेवक एजाज अहमद, राजुरा नगर परिषदेच्या सभापती पूनम गिरसावळे, नगरसेविका इंदुबाई निकोडे, अनुताई हरजीत सिंह संधू, मंगला मोकडे, कविता उपरे, तसेच सुमित्रा कुचनकर, सोनाली भगत, कुणाल मोकडे, रोहित बत्ताशंकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
