Monday, September 21, 2026
HomeEmployment'कोळसा आमचा, रोजगारही आमचा'

‘कोळसा आमचा, रोजगारही आमचा’

चंद्रपूर :- चंद्रपूर हा औद्योगिक व खाण क्षेत्रासाठी ओळखला जाणारा जिल्हा असतानाही येथील हजारो आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग तसेच पदवीधर युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे वेकोलि (WCL), एमआयडीसी आणि जिल्ह्यातील विविध मोठ्या उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना अपेक्षित संधी मिळत नसल्याचा आरोप शिवसेना भारतीय कामगार संघटनेने केला आहे. स्थानिक युवकांसाठी NATS व NAPS अंतर्गत अप्रेंटिसशिपच्या अधिकाधिक जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष लिलाबाई दशरथ पारखी यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. भारत सरकारच्या National Apprenticeship Training Scheme (NATS) आणि National Apprenticeship Promotion Scheme (NAPS) अंतर्गत युवकांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण, कौशल्यविकास तसेच स्टायपेंड मिळण्याची संधी उपलब्ध होते. चंद्रपूर जिल्हा Board of Apprenticeship Training (Western Region), मुंबईच्या कार्यक्षेत्रात येतो.
सन २०२६ मध्ये WCL मध्ये विविध ट्रेडसाठी अप्रेंटिस भरती प्रक्रिया सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक युवकांना या संधीचा अधिकाधिक लाभ मिळावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या आहेत प्रमुख मागण्या
WCLच्या चंद्रपूर, बल्लारपूर, वणी, वणी उत्तर आणि माजरी क्षेत्रांमध्ये स्थानिक युवकांसाठी अप्रेंटिसशिपच्या जागा वाढवाव्यात. तसेच एमआयडीसीतील सर्व कंपन्यांची बैठक घेऊन NATS/NAPS अंतर्गत उपलब्ध जागांचा आढावा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय आयटीआय, डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकानिहाय मार्गदर्शन व नोंदणी शिबिरे आयोजित करावीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली WCL, जिल्हा उद्योग केंद्र, रोजगार विभाग आणि आयटीआय संस्थांची संयुक्त बैठक घेऊन अप्रेंटिसशिपसाठी वार्षिक लक्ष्य निश्चित करावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

भूमिपुत्रांना प्रथम संधी द्या’
“चंद्रपूरच्या जमिनीतून कोळसा निघतो, त्याचे प्रदूषण स्थानिक नागरिक सहन करतात; मात्र रोजगाराच्या संधींपासून स्थानिक युवक वंचित राहता कामा नये. WCL आणि एमआयडीसीतील उद्योगांनी चंद्रपूरच्या भूमिपुत्रांना अप्रेंटिसशिपमध्ये प्राधान्याने संधी द्यावी,” अशी भूमिका संतोष पारखी यांनी मांडली.

स्थानिक बेरोजगार युवकांच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगार युवकांचा मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या निवेदनाच्या प्रती कौशल्य विकास आयुक्त, नवी मुंबई, BOAT मुंबई, WCLचे महाव्यवस्थापक तसेच जिल्हा उद्योग केंद्राकडे पाठविण्यात आल्या असल्याचे पारखी यांनी म्हटले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular