Monday, September 14, 2026
HomeCulturalदीक्षाभूमीच्या संवर्धनासाठी १६ सप्टेंबरला ‘आक्रोश मोर्चा’

दीक्षाभूमीच्या संवर्धनासाठी १६ सप्टेंबरला ‘आक्रोश मोर्चा’

चंद्रपूर :- ऐतिहासिक दीक्षाभूमीचे संवर्धन, सुयोग्य विकास आणि परिसराचे पावित्र्य अबाधित राखण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी चंद्रपुरात १६ सप्टेंबर रोजी भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. आंबेडकरी चळवळीतील तरुण-तरुणी तसेच समाजबांधवांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती प्रतिक डोर्लीकर यांनी पत्रपरिषदेत दिली. ‘Akrosh Morcha’ on September 16 for the conservation of Deekshabhoomi

दीक्षाभूमीतील ऐतिहासिक बुद्ध विहार पाडण्याऐवजी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येणार आहे. तसेच दीक्षाभूमीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन परिसरात नवीन बांधकामांना प्रतिबंध घालावा, अशीही मागणी आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या रचनेबाबतही आंदोलनकर्त्यांनी आक्षेप नोंदविला आहे. सोसायटीमध्ये एकाच परिवारातील संबंधित सदस्यांचा समावेश न ठेवता समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दीक्षाभूमी परिसरात नागरिकांच्या सुविधेसाठी तातडीने स्वच्छतागृहांची निर्मिती करावी, तसेच परिसराचे पावित्र्य कायम राखण्यासाठी व्यावसायिक स्टॉल्स आणि राजकीय कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अशी आग्रही भूमिका ‘दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन’ चंद्रपूर व स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी हा मोर्चा काढण्यात येणार असून, बौद्ध व आंबेडकरी समाजबांधवांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पत्रपरिषदेला अशोक टेंभरे, मृणाल कांबळे, सुरेश नारनवरे, हर्षल खोब्रागडे, गीता रामटेके, विजय करमरकर, लुंबिनी गणवीर यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular