चंद्रपूर :- महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यातील उमेदवारांची सैन्य भरती रॅली (अग्निवीर) विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकूल येथे 2 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत होणार आहे. सैन्य भरतीकरीता येणा-या उमेदवारांच्या सोयीसुविधांमध्ये आपण जिल्हा प्रशासन म्हणून कुठेही कमी पडता कामा नये, त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी अतिशय सुक्ष्म नियोजन करावे, अशा सचुना अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिल्या. Army (Agniveer) Recruitment in Chandrapur
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात, सैन्य भरती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. व्यवहारे बोलत होते. पुढे ते म्हणाले, महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग, पोलिस विभाग, राज्य परिवहन विभाग आदींनी एकत्रित विसापूर क्रीडा संकूल परिसराला भेट द्यावी. आपल्याला काय काय करायचे आहे, त्यासाठी कोणत्या विभागाशी समन्वय असायला पाहिजे, आदी बाबी आधीच ठरवून घ्या. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आवश्यक दुरुस्ती व विद्युतीकरणाशी संबंधित कामे आटोपल्यावरच इतर कामे करता येतील. त्यामुळे या कामांना गांभिर्याने घ्यावे. यात कोणतीही हयगय होऊ देऊ नका.
जिल्हा परिषदेने उमेद व माविमच्या बचत गटांमार्फत स्टेडियमच्या बाहेरील जागेत सशुल्क तत्वावर खाद्य पदार्थ व अनुषंगिक गोष्टींचे स्टॉल लावण्यास अवगत करावे. पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी कुमक उपलब्ध करून द्यावी. महानगरपालिका आणि नगर परिषदेने स्टेडियम परिसरात वाढलेल्या गवतांची आणि झुडपांची कटाई करावी. परिसरात स्वच्छता ठेवावी. स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत. परिवहन विभागाने उमेदवारांना ने-आण करण्याकरीता बसेसची व्यवस्था करावी. विद्युत विभागाने भरती दरम्यान अखंड वीज पुरवठा राहील, याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका, प्रथमोपचार साहित्य, डॉक्टरांची टीम तैनात ठेवावी. उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीकरीता शिक्षण विभागाने किमान 10 शिक्षकांची नियुक्ती करावी. वन विभागाने साप व इतर वन्यप्राण्यांपासून कोणतीही हानी होणार नाही, यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून ठेवावे, अशा सुचना अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिल्या.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, तहसीलदार रेणूका कोकाटे आदी उपस्थित होते.